संपादन म्हणजे भाषिक आणि साहित्यिक भान – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणेः- कोणत्याही साहित्य कृतीचा संपादन हा कणा असतो. लेखकाच्या मूळ आशयाला धक्का न लावात त्याचे बोट धरून ती साहित्यकृती मूर्त रूपात आणणे हे संपादकाचे मुख्य कौशल्य असते. संपादन म्हणजे केवळ इकडे वाक्य तिकडे आणि तिकडचे वाक्य इकडे असे नसून ते एक भाषिक आणि साहित्यिक भान असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ संपादक, कवी आणि कथाकार मनोहर सोनवणे यांच्या एकसष्टीनिमित्त आणि संपादकीय कारकिर्दीच्या रौप्यमहोत्सवा निमित्त डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कथाकार मनोहर सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर,राजहंस प्रकाशनचे संपादक डाॅ.सदानंद बोरसे, ज्येष्ठ गझलकार दीपक करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, संपादकाला लेखकाने मांडलेला आशय आणि विषय या दोन्हीचा अभ्यास करावा लागतो. संपादन म्हणजे केवळ वाक्यांची मोडतोड नसून त्याची आशयगर्भ मांडणी असते. जेव्हा एखादा लेखक साहित्य निर्मिती करीत असतो त्यावेळी भावनेच्या किंवा विषयाच्या आहारी जाऊन लेखन विस्कळीत होण्याची शक्यता असते. ती शक्यता गृहीत धरता एका परिपूर्ण, आशयघन आणि गोळीबंद साहित्यासाठी सकस संपादकाची गरज असते.

डाॅ.सदानंद बोरसे, दीपक करंदीकर, भारत सासणे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. संदिप तापकीर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: