त्रिपुरा हिंसाचार प्रकरण : अमरावतीत भाजपच्या बंदला हिंसक वळण

अमरावती : त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ अमरावतीत आज सलग दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला आहे. आजचा बंद हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुकारण्यात आला असून दुर्दैवाने या बंदला हिंसक वळण लागले. यामुळे अमरावतीत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून आंदोलकांकडून दगडफेक केली गेली. छोट्या दुकानांसह बंद दुकांनाचे नुकसानही करण्यात आले. पोलिसांकडून या हिंसक आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. सध्या अमरावतीत तणाव पूर्ण  शांतता असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरात मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ काल मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे मुस्लिम समाजाने मोर्चे काढले होते. आज (१३ नोव्हेंबर) मालेगाव, नांदेड, भिवंडी येथे तणावपूर्ण शांतता आहे. तर आज अमरावती येथे भाजपने बंदची हाक दिली आहे. सकाळी १० च्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांसह इतर आंदोलक रस्त्यावर उतरले व घोषणाबाजी सुरू केली. सकाळच्या सुमारास पोलिसांची कुमक कमी होती याचा फायदा घेवून काही आंदोलकांनी दगडफेक करायला सुरूवात केली आणि दुकानही फोडण्यात आली. लाखोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर आल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जाळपोळ, दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरूवात केली. काही ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कॅमेरामध्ये आंदोलकांची ही हिंसक वाटचाल कैद झाली आहे. आता आमरावतीच्या मध्यवर्ती चौकात आंदोलक जमले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

सामान्य जनतेला वेठीस धरू नका – यशोमती ठाकूर (पालकमंत्री, अमरावती)  

“कोणीही या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी. कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ”

 

Leave a Reply

%d bloggers like this: