ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक केशवराव जेधे यांना वंशजांतर्फे अभिवादन

पुणे :  छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी कान्होजी जेधे हे देशभक्त केशवराव जेधे यांचे पूर्वज होते. छत्रपती शाहू महाराजांनी व त्यानंतर महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग जेधे बंधूंनी घेतला. जेधे बंधू हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. अशा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक देशभक्त केशवराव जेधे यांच्या ६२ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या वंशजांनी स्वारगेट चौकातील केशवराव जेधे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, माजी महापौर कमल व्यवहारे, गौरव बोराडे, प्रविण करपे, दिग्वीजय जेधे, जेधे फाऊंडेशनचे सचिव युवा कार्यकर्ते व केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी दयानंद जेधे, अजय पाटील, करण जेधे, राणोजी जेधे आदी उपस्थित होते.

कमल व्यवहारे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश कालखंडात स्वातंत्र्यासाठी जेधे घराण्याचे मोठे योगदान आहे. देशाला संविधान असावे, याकरीता स्थापलेल्या घटना समितीवर केशवराव जेधे हे सदस्य होते. सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्य आंदोलन, अस्पृश्योद्धार चळवळ, शेतकरी कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन व महाराष्ट्रातील बहुजन समाजाला कॉंग्रेसमध्ये आणण्याचे कार्य त्यांनी केले. इतक्या विविधांगी व व्यापक प्रमाणात भिन्न क्षेत्रात काम करणारा नेता विरळाच असेल.

कान्होजी जेधे म्हणाले, केशवराव जेधे हे शिक्षक, पत्रकार, संपादक, कवी, लेखक, लोकनेते, सत्यशोधक व शाहीर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. कॉंग्रेसचा पाया अधिक व्यापक करणारे आणि बहुजन समाजाला बळकट नेतृत्व देणारे असे केशवराव जेधे हे व्यक्तिमत्व होते. कॉंग्रेसचा प्रसार व्हावा व प्रभाव वाढावा, याकरीता त्यांनी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग पिंजून काढला होता. त्यांचे विचार व कार्य महाराष्ट्राला कायमच प्रेरणा देत राहिल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: