रिक्षावाले काकांनी चिमुकल्यांना पोहोचविली शाळेची बाल दिनाची भेट
पुणे : मागील दोन वर्षे शिशु शाळेतील मुली कोरोनामुळे शाळेत येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बालदिनाची मज्जा चुकली आणि शाळेकडून मिळणारी भेट वस्तू देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे लोकमान्यनगरमधील शि.प्र.मंडळी मुलींच्या शिशु शाळेच्या वतीने बाल दिनाची मज्जा तुमच्या घरी या अंतर्गत रिक्षावाले काकांनी मुलींच्या घरी जाऊन खाऊ, भेटकार्ड आणि भेटवस्तू दिली.
नवी पेठेतील शि.प्र.मंडळी मुलींच्या शिशु शाळेत ‘बाल दिनाची मज्जा तुमच्या घरी’ हा उपक्रम राबवून रिक्षावाले काकांकडे या भेटवस्तू सुपूर्त करण्यात आल्या. शि.प्र.मंडळी मुलींच्या शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री एडगावकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. शाळा समिती अध्यक्ष सुधीर काळकर यांनी अगत्याने सर्व भेटवस्तू रिक्षावाले काकांकडे सुपूर्त केल्या. यावेळी रिक्षाचालकांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्व पालकांनी देखील भेट मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आणि मुलींचा भेटवस्तू देताना रिक्षावाल्या काकांसह फोटो टिपला. सर्व शिक्षकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती तसेच कोरोना प्रबोधनावरचे प्राण्यांचे बाहुली नाट्य, विविध गंमत खेळ इत्यादी गोष्टी मुलींना आॅनलाइन दाखविल्या. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.
