करदात्यांसाठी ‘जीएसटी’मध्ये सकारात्मक बदल – धनंजय आखाडे

पुणे : “करदात्यांच्या सोयीसाठी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीत सातत्याने बदल करण्यात येत आहेत. करभरणा करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, तसेच कर सल्लागार व सनदी लेखापालांकडून येणाऱ्या सूचना, सुधारणा यानुसार सकारात्मक बदल होत आहेत. त्यामुळेच ‘जीएसटी’च्या संकलनात वाढ होत असून, अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे,” असे मत महाराष्ट्र जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए), ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (जीएसटीपीएएम) आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआयएफटीपी’च्या ४५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘ज्ञानसंगम २०२१’ या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेच्या समारोपावेळी धनंजय आखाडे बोलत होते.

अमनोरा फर्न क्लब येथे झालेल्या कार्यक्रमावेळी परिषदेचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, ‘एआयएफटीपी’चे एम. श्रीनिवासा राव, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, एस. एस. सत्यनारायण, मुख्य सहसमन्वयक शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी आखाडे यांच्या हस्ते विविध सत्कार करण्यात आले. प्रसंगी नरेंद्र सोनावणे यांनी सतत तिसऱ्या वर्षी चेअरमन म्हणून मिळालेला मान आणि झालेला सत्कार याबद्दल सर्वांचे आभार मानले.

मंथन सत्रात ‘अपील मेकॅनिज्म अंडर जीएसटी’वर पुण्यातील ऍड. मिलिंद भोंडे व मुंबईतील ऍड. विनायक पाटकर, ‘कनॉन्स ऑफ जस्टीस : सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, टॅक्स ट्रिब्युनल’वर मुंबईतील ऍड. लक्ष्मीकुमारण, ‘फेक इन्व्हाईसिंग’वर सुरतमधील ऍड. अविनाश पोद्दार व गुवाहाटी येथील ऍड. अशोक सराफ, ‘फेसलेस असेसमेंट अंडर इन्कम टॅक्स’वर आयआरएस एस. के. दास व पुण्यातील सीए सुहास बोरा यांनी मार्गदर्शन केले. ‘टॅक्स की दंगल’ हे विशेष सत्र झाले.

त्यानंतर ‘रियल कॉन्ट्रोव्हर्सीज इन रियल इस्टेट इंडस्ट्री इन टॅक्सेशन’ या विषयावरील चर्चासत्रात ‘एआयएफटीपी’च्या माजी अध्यक्षा ऍड. निकिता बोडेखा, जीएसटी तज्ज्ञ सीए नरेश  सेठ, ‘एमटीपीए’चे माजी अध्यक्ष संतोष शर्मा, प्राप्तिकर तज्ज्ञ ऍड. धारण गांधी, सीए स्वप्नील मुनोत यांनी विचार मांडले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सीए सुहास बोरा होते, तर संचालन प्रकाश पटवर्धन व ऍड. किशोर लुल्ला यांनी केले.

धनंजय आखाडे म्हणाले, “करदाते व कर सल्लागारांना कर भरणा करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संबंधितांकडून सूचना, अभिप्राय मागवून जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आवश्यक ते बदल करण्यात येतात. हा कायदा लागू झाल्यापासून करदात्यांच्या सूचनांचा आदर करत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.”

नरेंद्र सोनवणे यांनी स्वागत प्रस्ताविक केले. अनुज चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. शरद सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: