पुणे जिल्ह्यातील ५० सहकारी बँका साजरा करणार सहकार सप्ताह

पुणे : सहकार दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीवर सहकाराचा ध्वज लावणे, सहकाराची बलस्थाने मांडणारा फलक प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर लावणे, सहकार दिनाच्या दिवशी खातेदारांना शुभेच्छा संदेश पाठविणे असे विविध कार्यक्रम सहकार सप्ताहांतर्गत पुणे जिल्हयातील ५० नागरी सहकारी बँकांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड.साहेबराव टकले, मानद सचिव संगिता कांकरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे आदी उपस्थित होते. सप्ताहामध्ये दररोज सायंकाळी ५ ते ६ यावेळेत सहकारातील मान्यवरांची आॅनलाईन व्याख्याने सहकारातील बलस्थाने या विषयावर आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त, भारत सरकारचे सहकार निबंधक, सहकार निवडणूक आयुक्त, सहकार परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर, सहकार मंत्री, राज्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिनांक १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान सहकार सप्ताह साजरा केला जाणार आहे. रविवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर्व सहकारी बँकांच्या मुख्य कचेरीवर सहकराचा ध्वज लावण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक बँकेच्या शाखेबाहेर सहकाराची बलस्थाने मांडणारा फलक देखील लावण्यात येईल. सहकार दिनाच्या पहिल्या दिवशी असोसिएशनतर्फे तयार करण्यात आलेला शुभेच्छा संदेश सर्व बँका एकाच वेळी सकाळी ११ वाजता आपापल्या खातेदारांना पाठविणार आहेत. तसेच सप्ताहात दररोज एक उत्तम संदेश देखील एकाच वेळेला सर्व बँकांनी खातेदारांना पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, गेल्या वर्षभरात सहकार क्षेत्रावर निरनिराळ्या मार्गाने आलेल्या संकटांमुळे सहकारी बँकिंगची एक नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. यावर उपाय म्हणून सहकाराची सकारात्मक बाजू व बलस्थाने सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सहकारी बँका एकत्रित येऊन हा सहकार सप्ताह वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सर्व बँकांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिका-यांसमवेत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

One thought on “पुणे जिल्ह्यातील ५० सहकारी बँका साजरा करणार सहकार सप्ताह

 • November 14, 2021 at 9:39 am
  Permalink

  सहकार वाचला पाहिजे,काही थोडी फार बोटावर मोजणे ऐवडी लोक सहकार बरबाद करतात,सहकाराला कलंक लावतात,मोठमोठ्या बँका मोडीत निगल्या,तया काय एक दिवसात निगल्या नाहीत,ऑडिट व्यवस्थित झाले पाहिजे,सहकारात मा यशवंतराव चव्हाण हयांच्या विचारांची,माणसे पाहिजे,तर सहकार पुढे जाईल, सहकारच्या विचारांनी भारावलेले कार्यकर्ते पाहिजे,तंज्ञ, डॉक्टर,वकील,सिए असून पण बँका का बुडीत निगतात,हायचा विचार झाला पाहिजे,सहकार,तरुण कार्यकर्त्यांच्या मनावर रुजवला पाहिजे,जास्तीत जास्त जाणत्या सभासदाना,सामावून घेतले पाहिजे,फक्त सप्ताह भरच आयोजन न करता कायमस्वरूपी सहकार,तयाचे कार्य,लोकांच्या मनामध्ये रुजवले पाहिजे,सहकारात खूप मोठी ताकद आहे,हे वेळोवेळी दाखवून दिले पाहिजे
  जालिंदर नवले
  जय सहकार

  Reply

Leave a Reply

%d bloggers like this: