महिला सरपंचांनी कार्यपद्धतींचा आभ्यास करुन प्रभावीपणे काम करावे- डॉ. निलम गोऱ्हे

औरंगाबाद: गावाच्या विकासात सरपंचाची भुमिका महत्वाची असते, हे लक्षात घेऊन महिला सरपंचांनी कार्यपद्धती समजून घेत नियमावलीचा अभ्यास करुन गावाच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तापडिया नाट्य मंदीर येथे आयोजित जिल्ह्यातील महिला सरपंच परिषदेत केले. यावेळी ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, परिषदेचे संयोजक आ. अंबादास दानवे, आमदार मनिषा कायंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिनाताई शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधाताई चव्हाण यांच्यासह जिल्हापरिषदेचे विविध समित्यांचे सभापती, लोकप्रतिनिधी, महिला सरपंच उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. गाव पातळीवरील महिला ही राजकारणाच्या माध्यमातून गावाच्या विकासात हातभार लावत आहे. हे काम करतांना बऱ्याच अडचणींचाही सामना करावा लागत असतो. त्यामुळे प्रत्येक महिला सरपंचांनी शासन कार्यपद्धतीचे वाचन, अभ्यास करावा, स्वत:चे संवाद कौशल्य वाढवावे. अजूनही लिहीता, वाचता येत नसेल तर लिहिणे, वाचणे आवर्जून शिकून घ्यावे म्हणजे आपण कुठल्याही दबावाला न झुकता व विरोधाला न जुमानता संयमाने प्रतिकुल परिस्थितीला अनुकुल बनवू शकतो आणि यालाच तर राजकारणही म्हणतात. ज्या माध्यमातून आपण आपल्या गावाला आरोग्य, शिक्षण, पाणी, महिला सक्षमीकरण व इतर माध्यमातून समृद्ध बनवू शकतो. जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायत सरपंच भास्कर पेरे यांनी देखील उत्कृष्ट कार्य करित गावाला समृद्धी मिळवून दिली आहे. त्याचप्रमाणे आपणही आपल्या गावाला विविध दृष्टीने समृद्ध करावे. त्यासाठी विविध योजना आपल्या गावात राबवण्यासाठी निधी मागणी करताना त्यांचा वेळोवेळी अभ्यासपूर्ण विकास आराखडा बैठकीत मांडत रहावा. त्याचबरोबर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनीही प्रत्येक आठवड्यातील एक दिवस महिला सरपंचाच्या बैठका घेऊन त्यांच्या मागणी बाबत विचार व कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारांबाबत अत्यंत संवेदनशील असून गावपातळीवरील विकासासाठी प्रयत्न करतांना त्यांनी राज्यातील सरपंचांशी दुरदृष्यप्रणालीद्वारे (Online) संवादही साधला आहे. तेव्हा प्रत्येक महिला सरपंचांनीही आपल्या गावात महिला सक्षमीकरणासाठी तत्पर रहावे. त्याचबरोबर गावपातळीवरील पोलीस दक्षता समितीमध्ये सरपंचानाही स्थान देण्याचे निर्देश श्रीमती गोऱ्हे यांनी संबंधितांना दिले.

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, लोकशाही मध्ये विकासकामे करतांना अभ्यासपूर्ण विचार मांडणे आवश्यक आहे. तेव्हा सरपंच महिला असो की पुरुष बदलत्या काळानुरुप शेतकरी, महिला, बालके, स्वच्छता व इतर विविध समस्यांचे निराकरण करुन प्रगती साधली पाहिजे. त्याचबरोबर बदलते हवामान तसेच गावपातळीचे प्रदुषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करताना गावची सनद बनवू शकतात. त्यासाठी निधीची मागणी केल्यास संपूर्ण सहाकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही गोऱ्हे यांनी यावेळी दिले. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत मिळून विविध योजना प्रभावीपणे राबविल्यास विकास निश्चितच घडून येतो, असेही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

कायंदे यांनी महिलांना आरक्षण मिळाले पंरतू, महिलांना राजकीय क्षेत्रात काम करतांना येणाऱ्या अडचणी, समस्या चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी या महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोरोना काळात महिला सरपंचानी उत्कृष्ट काम केले आहे. आणि आपलया गावाला कोरोना मुक्त केले आहे. आता आपल्या गावात शंभर टक्के कोरोना लसीकरणही करणार आहेत. तेव्हा या महिला सरपंचांनीही स्वत: पुढे येत आपण कुटुंबासोबत गावही सांभाळू शकतो. हे आत्मविश्वासाने दाखवून दिले पाहिजे, असे कायंदे यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: