भाजप आमदार आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

आशिष शेलार यांना राज ठाकरेंच्या भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘मी पेंग्विन प्रकाशनाचे ‘बूक ऑन मुव्ही’ हे छानसे पुस्तक राज ठाकरे यांना भेट दिले. त्यात जगभरातील १०० प्रसिद्ध चित्रपटांविषयी माहिती आहे. मी स्वतः हे पुस्तक पाहिले होते आणि आवडले होते. त्यामुळे या दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांना भेटायचे ठरले तेव्हा मी हे पुस्तक भेट दिले. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ही भेट केवळ आणि केवळ दिवाळीच्या शुभेच्छांचीच होती. या भेटीत या पलिकडे काहीही नाही.’

दरम्यान, आशिष शेलार यांनी ही भेट दिवाळी शुभेच्छांसाठी असल्याचे म्हटले असले तरी आता भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आले आहे. खरंतर आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. शेलार अनेकदा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर जातात, मात्र त्यावेळी भाजपाचा काय निरोप घेऊन ते आले, अशा चर्चाही रंगतात. त्यामुळे आताही आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही सदिच्छा भेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: