पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक संपन्न

देहरादून : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळीनिमित्त आज उत्तराखंडच्या केदारनाथ दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक करत भक्तीभावाने बाबा केदारनाथांची पूजा केली. केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधान २५० कोटींच्या केदारपुरी पुनर्विकास योजनांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

२०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर मोदी अनेकदा केदारनाथला आले आहेत. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे ते केदारनाथला गेले नव्हते. परंतु आता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ते पुन्हा एकदा केदारनाथच्या दर्शनाला गेले आहेत. मोदी एका महिन्यात दुसऱ्यांदा उत्तराखंडला गेले आहेत. दरम्यान, मोदी आज ज्या योजनांची घोषणा करणार आहे त्यामध्ये आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीसंदर्भातील योजनांचाही समावेश आहे. मोदींच्या हस्ते आदि गुरु शंकराचार्यांच्या प्रतिमेचेही अनावरण केले जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे येत्या काही महिन्यात उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. यावेळी मोदी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: