निराधारांसाठीच्या योजनांचे अनुदान दिवाळीपूर्वी मिळेल; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन

माजी आमदार मोहन जोशी यांनी केला पाठपुरावा

पुणे – निराधारांसाठी असणाऱ्या राज्य सरकारचे अनुदान दिवाळीपूर्वीच म्हणजे येत्या तीन दिवसांत लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना अशा पाच योजना आहेत. योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार ते एक हजार दोनशे रुपये अनुदान दिले जाते. गेल्या तीन महिन्यांपासून लाभार्थींना अनुदानच मिळालेले नव्हते. त्यामुळे, औषधपाणी आदीसाठी पैसे न मिळाल्याने निराधारांची परवड होत होती. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार मोहन जोशी यांनी पाठपुरावा करुन विषय मार्गी लावण्याचे ठरविले. याकरिता सरकारी खात्याकडून माहिती जमा केली आणि काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापुढे ही समस्या मांडली. थोरातांनी ताबडतोब प्रतिसाद दिला. येत्या तीन दिवसांत लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा होईल असे आश्वासन मोहन जोशी यांना दिले आणि प्रत्यक्ष कार्यवाहीचे आदेश दिले.

पुणे शहरामधील हजारो निराधारांचा या योजनांमध्ये समावेश आहे. येत्या तीन दिवसांत त्यांना अनुदान मिळणार असल्याने त्यांची दिवाळी आनंदात जाईल ,अशी प्रतिक्रिया माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: