विजयी ज्योतीने उजळला १९७१ च्या भारत-पाक युद्धाचा स्वर्र्णिम इतिहास
पुणे : भारतीय सेना ही नेहमीच शौर्य आणि साहसाचे प्रतिक म्हणून जगभरात ओळखली जाते. भारतीय सैन्याने प्रत्येक युद्धात आपले अभूतपूर्व साहस दाखविले आहे. त्यातीलच एक युद्ध म्हणजे सन १९७१ चे भारताचे पाकिस्तान बरोबर झालेले युद्ध. पाकिस्तानवर मिळालेल्या या विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात विजय ज्योतीला मानवंदना देण्यात आली. फुलांची उधळण, बँडच्या तालावर वाजणारी देशभक्तीपर गीते, घोषणा आणि आजी-माजी सैनिकांबरोबर नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने विजय ज्योतीला मानवंदना दिली.
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, पुणे महानगरच्यावतीने लक्ष्मीनगर पर्वती येथील सह्याद्री मैदानात आयोजित कार्यक्रमात सन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या यशाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाबद्दल स्वर्णिम विजय ज्योतीला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदन कमांडचे कर्नल अतुल शर्मा, परिषदेचे जनरल सेक्रेटरी कर्नल संजय बोरसे, कर्नल नरेश गोयल, परिषदेचे अध्यक्ष एयर व्हाईस मार्शल जयंत इनामदार, कर्नल सदानंद साळुंखे (निवृत्त), रा.स्व.संघ पुणे महानगरचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, महेश करपे, नगरसेविका स्मिता वस्ते, विनोद वस्ते, रवी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहीद जवान विजय मोरे यांच्या पत्नी दिपाली मोरे यांच्या सन्मान करण्यात आला.
कर्नल सदानंद साळुंखे म्हणाले, सैन्यदलात काम करीत असताना ४ डिसेंबरला पाकिस्तानविरूद्ध लढाईची सुरूवात झाली. तेव्हा रात्रीच्या वेळी आम्ही एलिफंट ग्रासच्या मागे लपून त्यांच्या सैन्यावर नजर ठेवून होतो. त्यावेळी माझ्याबरोबर असणा-या साथीदाराला तीन गोळ््या लागल्या होत्या. त्या अवस्थेत देखील तो लढत होता. त्याचसुमारास माझे हेल्मेट खाली पडले आणि आवाज झाला. त्यावेळी दुष्मन सैन्याने गोळीबार सुरू केला. मला फायरिंग करण्याची सूचना नसताना देखील मी फायरींगचे आदेश दिले आणि दुष्मन सैन्यातील तीन चार जण मृत्युमुखी पडले. दुर्देवाने आपल्या भारतीय सैन्यातील एक जवान जखमी झाला. अशा जीवावर बेतलेल्या अनेक प्रसंगाची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
कर्नल अतुल शर्मा म्हणाले, पाकिस्तान विरूध्द झालेल्या सन १९७१ च्या युध्दात भारतीय सैनिकांनी अभूतपूर्व कामगिरी केली. त्यांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी स्वर्णिम विजय वर्ष म्हणून हे वर्ष साजरे केले जात आहे. ही ज्योत देशातील काना-कोपºयातील शहिद जवानांच्या गावोगावी जाणार असून त्यानंतर तेथील माती दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात नेली जाणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.
कर्नल संजय बोरसे यांनी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, पुणे महानगरचे कार्य सांगितले. परिषदेच्यावतीने राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांची त्यांनी माहितीही सांगितली. शिल्पा देशपांडे व आर. जे. सुजाता यांनी सूत्रसंचालन केले. एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार यांनी आभार मानले.
