भारतीय सैनिकाचा सैन्य हाच धर्म – अनुराधा प्रभुदेसाई यांचे मत
पुणे : सामान्य माणूस आणि सैनिक यांच्या विचारांमध्ये खूप मोठा फरक असतो. सैन्यामध्ये कोणाचाही धर्म, जात किंवा पंथ बघितला जात नाही. सगळेजण एक सैनिक म्हणून एकत्र असतात. भारतीय सैन्य हाच सर्व सैनिकांचा धर्म असतो आणि सैन्यच सर्वांना महत्त्वाचे असते. असे मत लक्ष्य फाऊंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
सैन्यातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या वतीने युनिव्हर्सल पर्सोनल सिक्युरिटी ट्रेनिंग अँड अलाइड सर्व्हिसेस आणि अयोध्या फाउंडेशन यांच्या अंतर्गत काश्मीरमध्ये पाकिस्तान सीमेवर असलेल्या बांदीपुरा डिस्ट्रिक्ट येथील जवानांसाठी दिवाळी फराळ पाठविण्यात आला.
यावेळी अनिल गानू, कॅप्टन अनिरुद्ध बागाईतकर (नि.) कर्नल गिरीधर कोले (नि.), देवव्रत बापट उपस्थित होते.
अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या, कोणत्याही बटालियनचा सैनिक हा दुसऱ्या बटालियनच्या सैनिकांपेक्षा वेगळा नसतो. शिस्त हा समान धागा प्रत्येक सैनिकांमध्ये दिसून येतो. दुसऱ्यांप्रती आदर असणे ही सैनिकांमधील भावना अतिशय कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
कर्नल गिरीधर कोले (नि.) म्हणाले, सैन्यातील निवृत्त झाल्यानंतर सैनिकांना सैन्याची शिस्त, तेथे शिकलेल्या गोष्टी विसरणे अवघड जाते. पण त्याहीपेक्षा त्यांचे सहकारी अधिकारी आणि सैनिक यांना विसरणे कठीण असते. त्यामुळे सैन्यातून निवृत्त झालेल्या कॅप्टन उत्तम पाटील यांनी सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठवण्याची परंपरा सुरू केली.
सुरुवातीला ७ गढवाल राइफल्स येथील सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्यात आला परंतु त्यानंतर न थांबता १४ राष्ट्रीय रायफल्स आणि १४ आसाम राइफल्स येथे देखील फराळ पाठविण्यात येत आहे. दरवर्षी १५०० किलो मिठाई सैनिकांना पाठविण्यात येते.
