Wednesday, June 17, 2026
BusinessLatest NewsPUNE

वाढत्या बांधकाम खर्चामुळे घर घेणे महागणार ; क्रेडाई पुणे मेट्रोचे निरीक्षण

पुणे : स्टील, सिमेंट, कॉंक्रीट, टाईल्स, रंग यांबरोबरच आवश्यक बांधकाम खर्च वाढल्यामुळे नजीकच्या भविष्यात आपल्या स्वप्नांतील घराची खरेदी करणा-या गृहखरेदीदाराला घर घेणे महागात पडणार असून बांधकामाच्या किंमतीमध्ये तब्बल ३०० ते ४०० रुपये प्रति चौरस फूट इतकी वाढ होईल, असा अंदाज आहे. यामुळे सामान्य गृहखरेदीदाराला भुर्दंड तर बसणार आहेच, याबरोबर कोरोनाच्या दुस-या लाटेतून सावरत असलेल्या बांधकाम व्यवसाय क्षेत्रावरदेखील याचा परिणाम होईल, असे क्रेडाई पुणे मेट्रोचे निरीक्षण आहे.

देशातील एक प्रमुख रोजगार निर्मिती करणारे आणि जीडीपीमध्ये महत्वाचा वाटा असणा-या बांधकाम व्यवसाय क्षेत्रावर मागील दीड वर्षांच्या काळात कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, परराज्यातील मजुरांचे स्थलांतर यांबरोबरच इंधनांच्या वाढत्या किंमती यांचा विपरीत परिणाम झाला. त्यानंतर आता बांधकामासाठी आवश्यक बाबींच्या वाढत्या किंमती यामुळे हे क्षेत्र आणखीन संकटांचा सामना करीत आहे.

आवश्यक बांधकाम साहित्याचा विचार केल्यास २०१९ ते २०२१ दरम्यान प्रति गोणी सिमेंटची किंमत ही २७५ रु. पासून ३९०-४१० रु. इतकी वाढली आहे. प्रति किलो स्टीलची किंमती देखील ४० रुपयांहून ५६ ते ५७ रुपये इतकी वाढली आहे. कॉंक्रीटच्या किंमती या प्रति क्युबिक मीटर रु. ३,४०० वरून ५,६०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. तर टाईल्सच्या किंमतीमध्ये देखील २० ते ३०% इतकी वाढ झाली असल्याचे क्रेडाई पुणे मेट्रोचे निरीक्षण आहे.

याबद्दल अधिक बोलताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे म्हणाले, “बांधकामासाठी आवश्यक गोष्टींच्या वाढत्या किंमतींमुळे आता बांधकाम व्यावसायिकांना हा वाढीव खर्च स्वत: करणे अशक्य आहे. याचाच अर्थ नजीकच्या भविष्यात स्वत:चे घर घेऊ इच्छिणा-या गृहखरेदीदारावर हा वाढीव खर्च पडणार असून एकूण घराच्या किमतीमध्ये प्रती चौरस फूट ३०० ते ४०० रुपये इतकी वाढ होईल. शिवाय इतर श्रेणीतील घरांसोबतच परवडणारी घरे या श्रेणीतील घरांच्या किंमतीमध्ये देखील लक्षणीय वाढ होईल. सामान्य गृह खरेदीदारासोबतच आताच कुठे हळूहळू पूर्वपदावर येत असलेले बांधकाम व्यवसाय क्षेत्र यामध्ये पोळले जाणार असून केंद्र व राज्य सरकारने लवकरात लवकर या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणीत नागरिक व बांधकाम व्यावसायिक या दोघांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात येत आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading