महाविकास आघाडी सरकारला विद्यार्थ्यांच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नाही – आमदार मेघना बोर्डीकर
परभणी : महाविकास आघाडी सरकारला विद्यार्थ्यांच्या समस्येचे काहीही देणे घेणे नाही, स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम सरकार करत आहे. पण, आपण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. विद्यार्थी जेंव्हा जेंव्हा बोलवतील तेंव्हा तेंव्हा त्यांच्या समस्येसाठी रस्त्यावर येवून संघर्षास आपण तयार आहोत, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
आमदार बोर्डीकर यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविला. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या प्रसंगी अॅड. अमोल गिराम, आकाश लोहट, शिवाजी शेळके, दैवत लाटे यांच्या सह अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची येथे उपस्थिती होती. परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन येथे देण्यात आले.
पुढे बोलतांना आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, मी भाजपाची कार्यकर्ता व आमदार आहे, याचा मला अभिमान आहे, तसे पाहता विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण करण्याची गरज नाही. कुणीही विद्यार्थ्यांच्या समस्येवर राजकारण करु नये. विद्यार्थी समस्या बाबत मी विरोधी पक्षाच्या वतीने जनतेने दिलेल्या हक्काच्या सभागृहात प्रश्न मांडणारच! देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत विद्यार्थी परीक्षा वेळेत पूर्ण झाल्या. फडणवीस यांनी महापोर्टल चालू केले पण मागील दोन वर्षात सध्याच्या सरकारने एमपीएससीला अध्यक्ष देखील ठरवला नाही. फडणवीस साहेबांनी आवाज उठवला व या सरकारला अध्यक्ष नेमावा लागला. सरकारला जागे करण्याचे काम आमचे नेते फडणवीस करीत आहेत. प्रामाणिक हेतू समोर ठेवून मी परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी संबोधनात त्या म्हणाल्या की, हया सरकार मधिल राजेश टोपे साहेब, पारदर्शी अशी पुढची भरती घेऊ, पुढची भरती घेऊ असे सातत्याने सांगतात पण पुढची भरती कधी येणार आहे? कधी सुधारणा होणार? आमच्या विद्यार्थी लेकरांची समस्या कधी सोडवणार? 31 तारखेला देखील असलाच घोळ होणार आहे ! आमच्याविद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. याची जाणीव सरकारला करुन देण्यासाठी या ठिकाणी मी जमलेल्या विद्यार्थ्यांना व आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे, असा दिलासा आमदार बोर्डीकर यांनी दिला.
