Wednesday, July 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘मनी दाटते काहूर’ अल्बम रसिकांच्या भेटीला

पुणे : प्रतिभावान हिंदुस्थानी शास्त्रीय युवा कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या रागानेक्स्टने दोन नवीन, सुरेल भावगीतांचा ‘मनी दाटते काहूर’ हा व्हिडिओ अल्बम कानसेन रसिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे. कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि प्रतिभावान कवयित्री मंजिरी जोशी यांच्या भावस्पर्शी रचना या अल्बममध्ये असून या अल्बमचे प्रकाशन आज ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध गायक व संगीतकार पं. हेमंत पेंडसे यांनी संगीत दिले असून मिलिंद गुणे यांचे संगीत संयोजन आहे. अल्बमधील गायिका आणि  नायिका राधिका ताम्हनकर आहे.

रागानेक्स्टच्या वेगवेगळ्या उद्देशांपैकी एक प्रमुख उद्देश असून तरूण व नवीन कलाकारांना प्रोत्साहन देणे हाच हेतू असल्यामुळे ही गाणी बघण्यासाठी व ऐकण्यासाठी रसिकांना पूर्णत: विनामूल्य आहेत. रागानेक्स्टच्या युट्यूब चॅनेलवरून हा अल्बम बघता येणार असल्याचे श्री. अरुण जोशी यांनी स्पष्ट केले. पं. हेमंत पेंडसे यांच्या अत्यंत श्रवणीय व अवीट चाली असलेल्या रचना ऐकायला व बघायला फारच उत्तम व दर्जेदार झाल्या आहेत. अशोक शेलार यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चित्रिकरण केले आहे. ‘दूर दूर क्षितिजा पैल सावळासा घन बरसेल’ आणि ‘घन झाकळती नभ’ या दोन रचनांचा यात समावेश आहे.

ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे म्हणाल्या, अल्बमधील दोन्ही रचना अप्रतिम तर आहेतच त्याचबरोबरीने गायन, संगीत, संगीत संयोजन आणि चित्रिकरणही सुरेख झाले आहे. पं. हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचना यापूर्वी ऐकल्या आहेत. या अल्बमधील दोन्ही रचनांच्या शब्दांना अनुसरून चाली दिल्या आहेत. या अल्बमच्या माध्यमातून राधिका ही नव्या उमेदीची गायिका समोर आली आहे. तिने भावार्थ समजून रचना सादर केल्या आहेत. रागानेक्स्टने आपल्या सांगितिक उपक्रमातून आपले वेगळेपण सिद्ध करत रसिकांनाही संगीताविषयी वेगळी दृष्टी दिली आहे.
पं. हेमंत पेंडसे म्हणाले, रागानेक्स्टचे अरुण जोशी यांच्याशी झालेल्या संवादातून एक श्रेष्ठ कवी आणि एक नव्या कवीचे काव्य घेऊन अल्बम तयार करण्याची संकल्पना समोर आली. गेल्या दोन वर्षांपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सांगितिक क्षेत्रात वाटचाल करीत असलेल्या सर्वच युवा कलाकारांना स्वत:चे स्थान तयार करणे आता अजूनच कठीण होऊन बसले आहे. अत्यंत सुरेल व भावस्पर्शी गायन करणार्‍या राधिका ताम्हनकर हिची निवड रागानेक्स्टतर्फे करण्यात आली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading