Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

गुरुंनी आत्मसमर्पण भावाने शिष्याला विद्या द्यावी – शंकराचार्य श्रीमद् जगद््गुरु विद्या नृसिंह भारती ;

पुणे : आध्यात्मामध्ये सर्व संतांनी सांगितले आहे की, शिक्षण देताना या ह्रदयीचे त्या ह्रदयी द्यावे. गुरुंनी आत्मसमर्पण भावाने सर्व विद्या शिष्याला दिली पाहिजे. गुरु शिष्य घडवितो, हे व्यावहारिकदृष्टया असले, तरी गुरु हा गुरुच घडवत असतो. परीक्षा हे शिक्षणाचे मूल्यांकन नाही, तर गुरुने परिपूर्ण म्हटल्याशिवाय शिष्याचे शिक्षण पूर्ण होत नाही, असे मत करवीर पीठाचे शंकराचार्य श्रीमद्् जगद्गुरु विद्या नृसिंह भारती यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून गेली २४ वर्षे विनाशुल्क पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करीत सलगपणे शिकविण्याचे काम करणा-या शाहीर हेमंत मावळे यांचा विनामूल्य पोवाडा प्रशिक्षणाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिष्य परिवारातर्फे कृतज्ञता सन्मान करण्यात आला. सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळाच्या सभागृहात या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर, शाहीर गणेश टोकेकर, प्रा.संगीता मावळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानपत्र, पुष्पहार असे सन्मानाचे स्वरुप होते. शंकराचार्य यांच्या हस्ते शाहीर हेमंत मावळे यांना आचार्य ही उपाधी बहाल करण्यात आली.

विद्या नृसिंह भारती म्हणाले, गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये आधी शिक्षण आणि त्यानंतर गुरुदक्षिणा अशी पद्धती होती. आताच्या काळात प्रथम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाऐवजी स्वत:च्या पोटाचा विचार शिक्षक करतात. विद्यार्थी देखील शिक्षण हे केवळ भविष्यात पैसे मिळविण्यासाठी घेतात. त्यामुळे विद्या घेण्याचा मूळ हेतूच बाजूला राहिला आहे. आजच्या काळात शाहीर हेमंत मावळे यांनी विनामूल्य पोवाडा प्रशिक्षण देण्याच्या संकल्पनेतून उल्लेखनीय कार्य केले आहे.

शाहीर हेमंत मावळे म्हणाले, स्वर्गीय गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे व ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या कृपाशिवार्दाने माझ्या आयुष्यातील हा महत्त्वाचा सुवर्णक्षण आहे. अनेक दिग्गजांच्या सोबत राहून जीवनातील व्यावहारिक शिक्षण मला मिळाले. शाहिरी परंपरा टिकवायची असेल, तर शाहिरी शिकविणा-या उत्तम शिक्षकांची गरज आहे. तरच पुढच्या पिढीपर्यंत शाहिरीचे महत्व पोहचू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये शाहिरीचा प्रचार व प्रसार करणा-या शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीची वास्तु उभी करण्याकरीता वैयक्तिकरित्या हेमंत मावळे यांनी २५ हजार रुपयांचा निधी प्रबोधिनीला दिला. अजित वारणशिवार यांनी सूत्रसंचालन केले. अक्षदा इनामदार हिने प्रास्ताविक केले. आदिती कालेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading