विकासाच्या नावाखाली तळजाईची जैवविविधता नष्ट होउ देणार नाही – सचिन अहिर
पुणे : राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यावरण विषयांमध्ये खूप संवेदनशील आहेत. मुंबई मधील ‘आरे’चा विषय असो किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध येणारे सांगली जिल्ह्यातील भोसे गावाच्या हद्दीत असलेलं 400 वर्षांपूर्वीचं झाड वाचविणे असो वेळोवेळीच्या घटनांनी आदित्य ठाकरे हे संवेदनशील आहेत हे सिद्ध केले आहे. तळजाई हे पुण्याचे फुफुस असल्यामुळे आदित्यजी पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास पुणे शहराचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी व्यक्त केला. लवकरच सर्व संस्था पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना भेटणार असून त्याचीच पुर्वतयारी म्हणून या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
तळजाई वादग्रस्त प्रकल्पाविषयी माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत व शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्या माध्यमातून पुण्यातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी माजी राज्यमंत्री व शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची भेट घेतली. यावेळी बायोशेफर्स संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर, एन्व्हार्यमेंट क्लब ऑफ इंडियाचे ललित राठी, एरिया सभा असोसिएशनच्या वैशाली पाटकर, भूजल अभियानचे रवींद्र सिन्हा, सहकारनगर नागरी मंचाचे अमित अभ्यंकर, पुष्कर कुलकर्णी, सत्या सॅक्सस, रोहित भिसे उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले की, शहरांचा विकास करत असताना निसर्गांमधील विविध घटकांचा समतोल राखणे गरजेचे आहे. मानवाच्या अस्तित्वाबरोबर निसर्गाचेही अस्तित्व जपले पाहिजे. शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी एक चळवळ उभी राहणे हि काळाची गरज झाली आहे. सुदैवाने राज्याचे पर्यावरणमंत्री हे पर्यावरणाच्या बाबतीत खूप संवेदनशील आहेत. त्यांनी पर्यावरण संवर्धासाठी केलेली कामे राज्याने पहिली आहेत. पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता त्याची काळजी घेण्यास शिवसेना समर्थ असल्याचे अहिर म्हणाले.
अनंत घरत म्हणाले की, तळजाई वसुंधरा जैवविविधता प्रकल्प या गोंडस नावाखाली जो काही निसर्गाचा –हास होणार आहे तो थांबविण्यासाठी माय अर्थफांउडेशन सध्या लोकांमध्ये प्रबोधन करण्याबरोबर रस्त्यावरची लढाई लढत आहे. प्रकल्प रद्द करण्यासाठी सध्या आम्ही प्रशासकीय पातळीवर विरोध करत असून वेळेप्रसंगी विविध न्यायालयीन प्रक्रीयांना आम्ही सामोरे जाणार आहोत.
