गांधीविचार जगभर पोहचवण्याचे कार्य निर्मला देशपांडे यांनी केले : मोहन जोशी
पुणे : “गांधीवादी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या पद्मविभूषण माजी खासदार निर्मला देशपांडे यांनी गांधीविचार जगभर पोहचवण्याचे कार्य केले. सांप्रदायिक सौहार्द, शांतता वाढवण्यासाठी, तसेच महिला, आदिवासी आणि वंचितांची सेवा करण्याचे त्यांनी आपले जीवन समर्पित केले,” असे मत हरिजन सेवक संघ महाराष्ट्र अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
निर्मला दीदी देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात जोशी बोलत होते. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी देशपांडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे खजिनदार व कार्यकारी संचालक प्रथमेश विकास आबनावे, सहसचिव पुष्कर प्रसाद आबनावे आदी उपस्थित होते.
मोहन जोशी यांनी देशपांडे यांच्या कार्याची ओळख करून देताना सांगितले की, “निर्मला दीदी गांधीवादी विचारांशी एकरूप होत्या. त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत मोठे योगदान दिले. महात्मा गांधींचा ‘ग्राम स्वराज’चा संदेश भारतभर पोहचवण्यासाठी ४० हजार किलोमीटरची पदयात्रा केली. सर्वोदय आश्रमाच्या कार्यात त्यांनी झोकून दिले होते. निर्मला दीदी नेहरू-गांधी कुटुंबाच्या खूप जवळ होत्या. महिलांच्या कल्याणासाठी त्यांनी दिल्ली आणि मुंबईत काम करणाऱ्या महिलांसाठी घरे उभारली.”
“पंजाब आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. १९९४ मध्ये काश्मीरमध्ये शांतता मिशन आयोजित करणे आणि १९९६ मध्ये भारत-पाकिस्तान चर्चा या दोन महत्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या. चिनी दडपशाहीविरुद्ध तिबेटी लोकांचा आवाज उठवण्यातही त्या अग्रभागी असत,” असे जोशी यांनी नमूद केले.
प्रथमेश विकास आबनावे यांनी प्रास्ताविक केले. पुष्कर प्रसाद आबनावे यांनी आभार मानले.
