विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट
पुणे: राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावसह इतर काही जिल्हांत देखील पावसाची शक्यता आहे.
परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. परतीच्या पावसानं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर दहा दिवसांच्या उघडीपनंतर वाशिम जिल्ह्यात काल परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
