‘आमच्याविरोधात ट्रकभर पुरावे होते, त्याचं काय झालं?’, सुप्रिया सुळेंचा किरीट सोमय्यांना सवाल
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, अशी बेनामी संपत्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कसं चालतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हाला ५० वर्षांपासून आरोपांची सवय आहे. आमच्याविरोधात ट्रकभर पुरावे होते. त्यांचं काय झालं? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय.”
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाहीये. या देशात कुणीही काही करत असेल तर त्याला चिंता असावी, ज्यानं काही केलं नाही त्याला चिंता नाही. आम्हाला ५० वर्षांपासून आरोपांची सवय आहे. आमच्याविरोधात ट्रक भरून पुरावे होते. त्याचं काय झालं? हे सर्व उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. मला आधी लहान असताना या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा. जसंजसं वय वाढत गेलं तसं लक्षात आलं हे खोटे आरोप जेव्हा करतात तेव्हा त्या लोकांना खूप प्रसिद्धी मिळते. आपल्यामुळे एखादा माणूस प्रसिद्ध होत असेल तर ही किती आनंदाची गोष्ट आहे,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे.
