वाचन हा जीवनशैलीचा भाग व्हावा : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : जीवनाचे झालेले शहरीकरण, स्पर्धेच्या युगात अस्तित्वासाठी सुरु असलेला संघर्ष, धावपळीची जीवनशैली आणि बदललेले प्राधान्यक्रम यामुळे वाचनासाठी वेळच मिळत नाही अशी तक्रार आज केली जाते. पोटाच्या भुकेइतकीच बुद्धीची भूकही महत्त्वाची आहे. तिच्याकडे सुशिक्षित वर्गाचे दुर्लक्ष होत आहे. अन्नामुळे शरीराचे भरणपोषण होते. वाचनामुळे मन, बुद्धी आणि भावना यांचे पोषण होते. त्यामुळे वाचन हा जीवन शैलीचा भाग व्हावा असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. ‘वाचनप्रेरणा दिनानिमित्त’ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात गेल्या ४२ वर्षांपासून नियमित येणारे वाचक रत्नाकर वाघ, २२ वर्षांपासून येणारे मधुकर महाजन, २५ वर्षांपासून येणाऱ्या श्यामला पानसे, विद्यार्थी साईराज घाटपांडे आणि निकिता शेंडगे या चोखंदळ वाचकांचा ग्रंथभेट आणि सन्मानचिन्ह देऊन प्रा. जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह वि. दा. पिंगळे, माधव राजगुरू, बंडा जोशी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ‘आजची मुले अवांतर वाचन करताना दिसत नाहीत अशी तक्रार केली जाते. शिक्षक आणि पालक वाचन करताना दिसले तरच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल. कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीत सर्वांना पुस्तकांची प्रकर्षाने आठवण झाली. ही दिलासादायक गोष्ट आहे. पुस्तकांच्या वाचनामुळे आणि त्यातील अनुभवामुळे एकाच आयुष्यात अनेक जीवने जगल्याची अनुभूती घेता येते. पुस्तकांमुळे मनावर आलेले निराशेचे मळभ दूर होते. आणि सकारात्मक विचारामुळे मने प्रज्वलित होतात. तंत्रज्ञानाचे महत्व कोणीही नाकारलेले नाही तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपल्याला यंत्रमानव बनायचे नाही. भावसंपन्न, विवेकी आणि विचारशील पिढी घडविण्यासाठी वाचनाची कास धरणे आवश्यक आहे. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीयांची आर्थिक ऐपत वाढली. हा पैसा मॉल, मल्टिप्लेक्स आणि रेस्टोरंटमध्ये जितक्या सढळ हाताने खर्च होतो तितका पुस्तक खरेदी करण्यासाठी का होत नाही. याचे चिंतन समाजाने करण्याची गरज आहे. समाज भौतिकदृष्टया संपन्न होत असताना वैचारिक दारिद्र्य दूर करण्यासाठी वाचनाची कास धरणे आवश्यक आहे.

साहित्य परिषदेच्या ग्रंथालयामुळे आम्ही समृद्ध झालो अशी भावना सर्व चोखंदळ वाचकांनी व्यक्त केली. वि. दा. पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: