इंद्राणी बालन फाउंडेशनच्या पुढाकारातून काश्मीरच्या बारामुल्लामध्ये डॅगर परिवार स्कूलचे उद्घाटन

पुणे : इंद्राणी बालन फाउंडेशन, पुणे आणि भारतीय लष्कराची चिनार कोअर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा भाग म्हणून काश्मीरमधील बारामुल्ला येथे डॅगर परिवार स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. २०१७ पासून बारामुल्ला परिसरातील दिव्यांग मुलांसाठी ही शाळा सुरु आहे. काश्मीरसारख्या दहशतीच्या छायेतील राज्यात मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये या हेतूने इंद्राणी बालन फाउंडेशनने या शैक्षणिक उपक्रमासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. चिनार कोअर बरोबरच्या संयुक्त प्रयत्नांतून डॅगर परिवार स्कूलसाठीअद्ययावत आणि भव्य इमारतीचे बांधकाम इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

बारामुल्ला येथे नुकत्याच झालेल्या विशेष कार्यक्रमात १५ कोअरच्या आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशनच्या विभागीय अध्यक्ष उषा पांडे आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्या जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. चिनार कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, डॅगर डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल वीरेंद्र वत्स, बारामुल्लाचे पोलिस अधिक्षक रईस मोहंमद भट आणि प्रशासकीय अधिकारी तौसिफ रैना, ब्रिगेडियर अमित धीर, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

बारामुल्ला परिसरातील १५० पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डॅगर परिवार स्कूल महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या शाळेच्या इमारतीची रचना करण्यात आली आहे. त्यांच्या क्षमतांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम आणि आवश्यक उपचार पद्धती या शाळेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

चिनार कोअरचे जीओसी लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी बारामुल्लामधील विद्यार्थ्यांसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराबद्दल प्रशंसा केली.

इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन म्हणाले, भारतीय लष्कराच्या चिनार कोअरबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचा भाग म्हणून आर्मी गुडविल स्कूल्सला पायाभूत सुविधा, तांत्रिक आणि शैक्षणिक स्थैर्य देण्याला आमचे प्राधान्य असेल. काश्मीरमधील विद्यार्थ्यांना सर्वप्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी इंद्राणी बालन फाउंडेशन सर्वतोपरी योगदान देणार असल्याची ग्वाही पुनीत बालन यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: