शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत डॉ. कल्याण गंगवाल ‘करुणा इन कोरोना’ या विषयावर  संबोधन करणार

पुणे : शिकागो (अमेरिका) येथे १६ ते १८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होत असलेल्या जागतिक धर्म परिषदेत पुण्यातील शाकाहार पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ही गोष्ट पुणेकरांसह सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची आहे. स्वामी विवेकानंदानी ज्या व्यासपीठावरून भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडवले, त्याच व्यासपीठावरून डॉ. गंगवाल कोरोना काळातील करुणेचे दर्शन घडवणार आहेत.

 

या परिषदेत डॉ. कल्याण गंगवाल यांच्या नेतृत्वात ‘करुणा इन कोरोना’ या विषयावरील ४५ मिनिटांचे चर्चासत्र होणार असून, त्यामध्ये डॉ. गंगवाल यांच्यासह एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, मुस्लिम विचारवंत डॉ. एस. एन. पठाण, ख्रिश्चन विचारवंत एडिसन सामराज हे सहभागी होणार आहेत. हे चर्चासत्र १८ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ११.१५ वाजता प्रसारित होणार आहे. हे चर्चासत्र https://parliamentofreligions.org/civicrm/mailing/view?id=809&reset=1 या लिंकवर पाहता येईल.
याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण १८९३ मध्ये भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये आपल्या व्याख्यानाद्वारे भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली होती. त्याच शिकागो (अमेरिका) येथे होत असलेल्या जागतिक धर्म परिषदेत (पार्लमेंट ऑफ द वर्ल्ड रिलिजन्स) मला विचार मांडण्याची संधी मिळते आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला ग्रासले असतानाही या काळात एकमेव गोष्ट शाश्वत होती, ती म्हणजे करुणा आणि माणुसकी. भारतीय संस्कृतीत, परंपरेत करुणेला अपार महत्व आहे. कोरोना काळातील करुणा व अहिंसा जगासमोर मांडण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. जगाच्या समोर करुणा, प्रेम, अहिंसा, जैन जीवनशैली यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या चर्चासत्रात केला जाणार आहे. संपूर्ण जगातील दोन कोटी लोक हा कार्यक्रम आपापल्या देशात पाहणार आहेत, असा संयोजकांचा दावा आहे. हा कार्यक्रम त्यात्या देशातील त्यात्या भाषेत सबटायटल टाकून दाखवणार आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: