श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे कोविडमध्ये पालकांचे छत्र हरपलेल्या मुलींचे पूजन

पुणे : श्री महालक्ष्मी माता की जय… श्री सरस्वती माता की जय… श्री दुर्गा माता की जय… या  स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीस्वरुप असलेल्या लहान मुलींनी देवीनामाचा जयघोष केला. कन्यापूजनाच्या निमित्ताने आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहताना प्रत्येक चिमुकलीच्या चेह-यावरील आनंद काहीसा वेगळा होता. नृत्यांगना वैष्णवी पाटील, गिरीजा पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोविडमध्ये पालकांचे छत्र हरपलेल्या मुलींचे कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन, औक्षण करुन त्यांना भेटवस्तू देखील दिल्या. 

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात मंदिरात कोविडमध्ये पालकांचे छत्र हरपलेल्या, झोपडपट्टीमध्ये राहणा-या गरीब मुलींच्या कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, नृत्यांगना वैष्णवी पाटील, गिरीजा पाटील, मंदिराच्या विश्वस्त तृप्ती अग्रवाल, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, चरणजीत सिंग सहानी, सतिश गायकवाड, माजी नगरसेविका मनिषा चोरबेले, अमिता जैन, पपिता मर्लेचा, प्रेमा पाटोदिया आदी उपस्थित होते. 

मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. कन्यापूजनानंतर ट्रस्टतर्फे सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य, खाऊ व भेटवस्तू देखील देण्यात आल्या. 
तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, मोठे होऊन आपल्या आई-वडिलांना आणि मोठयांना कधीही वृद्धाश्रमात टाकायचे नाही, हे प्रत्येक मुलाने मनात पक्के ठरविले पाहिजे. शिक्षक तसे चांगले संस्कार देखील मुलांवर करतात. शिक्षकांनी कोविड काळात शिक्षण सुरु ठेवण्याचे कार्य केले. त्यामुळे ते देखील कोविड योद्धे आहेत. 
प्रविण चोरबेले म्हणाले, शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणा-या मातांची रुपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींंमध्ये ही रुपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरुप असते. मात्र, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. तरच देवी प्रसन्न होईल. कुटुंबात मुलगी होणे, ही गर्वाची बाब आहे. यंदा वस्ती भागातील मुलींचे कन्यापूजन मंदिरातर्फे केले जात आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन पूजा संकल्प तसेच  फेसबुक पेज  व  युट्यूब तसेच स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: