Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

कविता, गाणी आणि आठवणीतून उलगडल्या शांताबाई  

साहित्य परिषदेत शांता शेळके यांना जन्मशताब्दी निमित्त अभिवादन

पुणे : जय शारदे वागीश्वरी, ही वाट दूर जाते, तोच चंद्रमा नभात, मागते मन एक काही, जीवलगा राहिले दूर घर माझे, माझे राणी माझे मोगाय, डोलकर डोलकर दर्याचा राजा, किलबिल किलबिल, हे श्याम सुंदर, शूर आम्ही सरदार, नाव सांग सांग, रेशमाच्या रेघांनी,  शारद सुंदर,

मराठी पाऊल पडते पुढे, या सारख्या रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गीतांचे सादरीकरण, त्या गाण्यांच्या निर्मितीचा इतिहास, कविता आणि ललित लेखनाचे  अभिवाचन  यातून प्रतिभासंपन्न कवयित्री शांता शेळके यांच्या साहित्याचा आणि आठवणीचा जागर महाराष्ट्र साहित्य परिषदेत करण्यात आला. निमित्त होते शांता शेळके यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या प्रारंभाचे. या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेने गोल्डन मेमरीज प्रस्तुत ‘आठवणीतल्या शांताबाई’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती चैत्राली अभ्यंकर यांची होती आणि हेमंत वाळुंजकर आणि चैत्राली अभ्यंकर यांनी गीत गायन केले. सांगीतिक साथ केदार परांजपे प्रसन्न बाम, राजेंद्र हसबनीस, ऋतुराज कोरे यांनी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रमोद आडकर, दीपक करंदीकर, वि. दा. पिंगळे, उद्धव कानडे, राजीव बर्वे, सतीश देसाई, आनंद देशमुख, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

शांताबाईंच्या जीवनात साहित्याला सर्वोच्च स्थान : प्रा. मिलिंद जोशी

प्रा. जोशी म्हणाले, कधीं निखळ कला निर्मितीसाठी तर कधी व्यवसाय म्हणून शांताबाई उत्कटपणे लेखनात रमल्या. साहित्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती हीच शांताबाईंची खरी ओळख होती. शांताबाईंनी विविध वाडमय प्रकार लीलया हाताळले असले तरी त्यांचे पहिले प्रेम कवितेवरच होते. साहित्यालाच त्यांच्या जीवनात सर्वोच्च स्थान होते.

‘शांता शेळके यांच्या सुरुवातीच्या कवितेवर रविकिरण मंडळातील कविंच्या कवितांचा प्रभाव होता पुढें त्यांना त्यांची स्वतंत्र वाट सापडली. शांताबाईना प्रौढ, विदग्ध आणि संस्कृतप्रचुर भाषाशैलीचे खूप आकर्षण होते. त्यांच्या लेखनाचे हे संस्कृत वळण  आचार्य अत्रेंच्या नवयुगमध्ये काम करताना बदलून गेले. प्रतिभा, स्फूर्ती आणि मुड लागणे यांचा बाऊ न करता तसेच लेखनाची बैठक न जमवताही उत्तम लिहिता येते याची जाणीव त्यांना झाली. असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading