शैक्षणिक शुल्कावरून अभाविपचे एस. पी महाविद्यालय आंदोलन
पुणे : संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे अनेकांच्या आर्थिक स्थितीवर दूरगामी परिणाम झाला आहे. या स्थितीमध्ये पालक अतिशय हवालदिल झाले आहेत. आर्थिक स्थिती खालावल्यामुळे विद्यार्थी व पालक शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी असमर्थ आहेत. या समस्येचा विचार करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणेच्या वतीने स. प. महाविद्यालय प्रशासनाकडे शैक्षणिक शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु महाविद्यालय प्रशासनाकडून या मागणीस कुठल्याही प्रकारची दाद देण्यात आली नाही. तसेच क्रीडा कोट्यातील राखीव जागा देखील महाविद्यालय प्रशासनाने अतिरिक्त पैसे भरून भरल्या आहेत.
या समस्यांना घेऊन अभाविप पुणे महानगराच्या वतीने महाविद्यालय प्रशासनाला वारंवार निवेदनं देण्यात आली होती. परंतु अभाविपच्या या निवेदनाला महाविद्यालय प्रशासनाकडून दाद मिळाली नाही. यामुळे आज अभाविपच्या वतीने स. प. महाविद्यालय येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. तसेच सर्व समस्यांचे येत्या दोन दिवसांमध्ये निराकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. स.प. महाविद्यालय प्रशासनाने पुढील दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या या समस्यांचे निवारण न केल्यास अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा अभाविप पुणेचे मंत्री शुभंकर बाचल यांनी दिला आहे.
