रोजंदारी तसेच कंत्राटी कामगारांना बोनस व सानुग्रह अनुदान आणि कोविड भत्ता मिळावा : विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ
पुणे : पुणे महानगरपालिकेतील सर्व कायम कामगारांना आपण बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे रोजंदारी तसेच कंत्राटी कामगारांना बोनस व सानुग्रह अनुदान आणि कोविड भत्ता मिळावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी आज केली आहे.
दिपाली धुमाळ म्हणाल्या, पुणे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या रोजंदारी व कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगारही काम करीत आहेत. त्यामध्ये सुरक्षा रक्षक, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, स्मशानभुमीत काम करणारे कामगार, मलनिसा:रण विभाग, झाडूखाते व इतरही सर्व खात्यांमध्ये कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या सर्व कामगारांनी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना काळामध्ये काम केले आहे. त्यामध्ये काही कंत्राटी कामगारांनी आपला जीव गमावला आहे. त्याची झळ त्यांच्या कुटूंबांनी भोगली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावणाऱ्या या सर्व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे ८.३३ टक्के बोनस व १७,०००/- सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच कोविङ कालावधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ताही देण्यात यावा. म्हणजे या सर्व कामगारांनाही त्यांनी केलेल्या कामाचे मोल मिळाल्यासारखे होईल, असे ही त्या म्हणाल्या.
