आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद – देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने आज राज्यभर बंद पुकारला आहे. हा पुकारलेला बंद ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा दिसत आहे. आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल करीत मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी टीकाही त्यांनी केली.
उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यात महाविकास आघाडी कडून बंद पुकारण्यात आला आहे. या विषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे. आताचं सरकार हे ढोंगीबाज सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. हे सरकार मदत करत नाही. त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, असे फडणवीस म्हणाले.
