संदर्भ ग्रंथपालाचे साहित्य निर्मितीत अनन्य साधारण महत्व – डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख
पुणेः- ज्ञानाच्या क्षेत्रात झोकून काम करणे दुर्मीळ! पण ते समरसून अ, असेल तेंव्हाच मोठे काम उभे राहते. लेखनासाठीही अचूक संदर्भासहीत साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने संदर्भ ग्रंथपालाचे अनन्य साधारण महत्व असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
जयकर ग्रंथालयाचे निवृत्त संदर्भ ग्रंथपाल, पुणे शहराचा ज्ञानकोशकार डाॅ. शांताराम गजानन तथा शां.ग.महाजन यांचा संवाद पुणेतर्फ जीवनगाैरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संवाद पुणेचे सुनील महाजन, संदर्भ ग्रंथपाल व शां.ग.महाजन यांचे शिष्य प्रसाद भडसावळे, पत्रकार मुकुंद संगोराम, युनिव्हर्सल प्रकाशन संस्थेचे भालचंद्र जुवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख यावेळी म्हणाले, प्रत्येक शहराला आपला स्वतःचा असा एक इतिहास असतो. त्याची नोंद केल्याशिवाय त्या शहरात राहणा-या व्यक्तींना देखील शहरचे भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या नक्की काय महत्त्व आहे हे लक्षात येत नाही. ग्रंथालय आणि ग्रंथपाल हे लेखकाच्या साहित्य निर्मितीचे मुख्य दुवे असतात. हा दुवा कच्चा असेल तर लेखकात हतबलतेची भावना वाढीस लागते. मी अफगाणीस्थान वर लिहिलेल्या पुस्तकावेळी मला ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांचे प्रचंड सहकार्य मिळाल्याने मी परीपूर्ण पुस्तक लिहू शकतो. आजही आपल्याकडे एेतिहासिक नोंदी घेण्याबाबत, त्या टिपून ठेवण्याबाबत निराशा, अनास्था दिसून येते ही अनास्था आणि आळस झटकून विचारवंतांनी, अभ्यासकांनी नोंदी घेण्याच्या कामास प्रारंभ केला पाहिजे. त्यात आवश्यकतेनुसार पुढील पिढी जसा संदर्भ बदलत जाईल त्यानुसार नोंदींची भर घालत जाईल. नवीन पिढीला इतिहासात अचूक नोंदींची भर घालण्यासाठी मुळात आधीच्या नोंदी असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ग्रंथपाल डाॅ. शां.ग.महाजन यांचे कार्य अतुलनीय आहे.
यावेळी डाॅ. शां.ग.महाजन यांच्या पत्नी प्रभा महाजन, संवाद पुणेचे सुनील महाजन, संदर्भ ग्रंथपाल आणि शां.ग.महाजन यांचे शिष्य प्रसाद भडसावळे, पत्रकार मुकुंद संगोराम, युनिव्हर्सल प्रकाशन संस्थेचे भालचंद्र जुवळे आदींनी थोडक्यात मनोगत व्यक्त केली.
डाॅ. मोनिका रवींद्र महाजन यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.आणि उपस्थितांचे आभार मानले.
