‘त्या’ पार्टीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा व्यक्ती होता – देवेंद्र फडणवीस यांचा दावा
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ‘क्रुझवर झालेल्या पार्टीमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या जवळची एक व्यक्ती होती मात्र त्यांच्याकडे काही नव्हते यामुळे त्याचे नाव घेणार नसल्याचे सांगितले.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
फडणवीस म्हणाले, ‘ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. याचे राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडलं त्यामध्ये राष्ट्रवादी च्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या जवळची एक व्यक्ती होती, त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की, तो क्लीन होता. त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे’ NCB ने अगोदरच सांगितले होते की, त्यांनी अनेक लोकांना पकडले होते, त्याच्यातील जे क्लीन होते त्यांना त्यांनी सोडलं आहे. ज्यांच्याकडे काही सापडलं, ज्यांच्या फोनमध्ये काही पुरावे सापडले, त्यांना पकडले’ असं म्हणत फडणवीस यांनी एनसीबीची पाठराखण केली.
‘आयकर विभागाने ज्या धाडी टाकले आहेत. त्या दोन प्रकारचे आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या कारवाईबद्दल आयकर विभागाने 1,050 कोटी रुपयांच्या दलालीचे पुरावे सापडल्याचे सांगितले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. माध्यमांनाही त्याच गांभीर्य अजून कळलेलं नाही. ही 1050 कोटींची दलाली बदल्यांसाठीची आहे, टेंडर साठीची आहे. असे देशात पहिल्यांदाच होत आहे’ असंही फडणवीस म्हणाले.
साखर कारखाना खरेदी करताना तुम्ही तो लाचेच्या किंवा काळ्या पैशाने त्याबद्दल फक्त टॅक्स भरून तो पांढरा पैसा आहे असं भासवून खरेदी करू शकत नाही. कारखाना खरेदी करताना तो योग्य पैशानेच खरेदी करावा लागतो. मात्र, या पाचही प्रकरणात तसं झालं नव्हतं. त्या प्रकारच्या तक्रारी होत्या आणि त्यानंतरच आयकर विभागाने कारवाई केली आहे, असं म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
‘पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाई पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहे असं म्हणणं चुकीचं आहे’ असे फडणवीस म्हणाले.
