Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ च्या माध्यमातून अहमदनगरच्या विकासाला चालना – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अहमदनगर : “येत्या काळात महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. या माध्यमातून महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर आणण्याचा प्रयत्न राहिल, तसेच ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. यावेळी गडकरी यांनी अहमदनगर च्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तीन रस्त्यांच्या कामांची घोषणाही केली.

अहमदनगर येथे आज  ४०७५ कोटी किंमतीच्या ५२७ किलोमीटर  लांबीच्या २५ महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसभा सदस्य  शरद पवार, ग्रामविकास-कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिवराव लोखंडे, सुजय विखे पाटील, महापौर  रोहिणी शेडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, आमदार अरुणकाका जगताप, बबनराव पाचपुते,  मोनिका राजळे, संग्राम जगताप,  रोहित पवार,  निलेश लंके आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, सुरत-नाशिक-नगर-सोलापूरमार्ग चेन्नईला जाणाऱ्या नवीन ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ ची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १८० किलोमीटर आहे‌. यात महाराष्ट्रात ५० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. यातील अहमदनगर जिल्ह्यातच ८ हजार कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात जेथे शक्य असेल तेथे लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रियल क्लस्टर व ट्रांसपोर्ट नगर उभारणे शक्य आहे. त्यामूळे नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. येथील तरूणांच्या हाताला काम मिळेल. एक्सीस कंट्रोलने हा महामार्ग बांधत आहोत.  सुरतपासून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई (दिल्ली-मद्रास) असा  १२७० किलोमीटरचा महामार्ग असेल. सध्या याची लांबी १६०० किलोमीटर आहे. म्हणजेच या रस्त्याची महाराष्ट्रातून जाणारी ३३० किलोमीटर लांबी कमी होणार आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यायाने अहमदनगर साठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

अहमदनगर साठी महत्वपूर्ण ठरतील असे तळेगांव – पाटोदा (रा.म.५४८) जामखेड-सौताळा (बीड-१३५ कोटी) व कोपरगांव – सावळी विहीर-(१५० कोटी) या रस्ते कामांची घोषणा करत नितीन गडकरी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळ परिसराच्या बाजूला नवीन स्मार्ट सिटी वसविण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. अशी नवीन शहरे वसविल्यास स्थानिक परिसराच्या विकासाला व रोजगाराला चालना मिळते. कोणत्याही देश व राज्याचा विकास पाणी, ऊर्जा, दळणवळण व संदेशवहन या चार गोष्टींवर अवलंबून असतो. या गोष्टी असल्यावर उद्योगांचे जाळे तयार होते. पर्यायाने रोजगार वाढतो.

पवार म्हणाले, गडकरींच्या केंद्रीय मंत्रिपदापूर्वी ५ हजार किलोमीटर रस्ते कामे झाली होती. ते आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून १२ हजार किलोमीटर रस्त्यांची कामे झाली आहेत. लोकप्रतिनिधी कशाप्रकारे देशाच्या उभारणीसाठी काम करू शकतात त्याचे उत्तम उदाहरण गडकरी आहेत. अहमदनगर जिल्हा शेतीमध्ये संपन्न आहे. येथील  शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानचा वापर करत शेतीपूरक उद्योगाकडे वळले पाहिजे. साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.

मुश्रीफ म्हणाले, शहरातील ‘उड्डाणपूल टप्पा क्रमांक दोन’च्या कामात केंद्राने मदत करावी. पुणे-औरंगाबाद मार्गाची वाहतूक जलद गतीने व्हावी, शिर्डी बाह्यवळण रस्ता, सावळी विहीर- कोपरगांव या रस्त्यांच्या कामात श्री.गडकरी अहमदनगर जिल्ह्याला मदत करतील. अशी अपेक्षा ही  मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading