fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

लेखणीत समाजाचे प्रश्न, सत्य मांडण्याची ताकद – सुशीलकुमार शिंदे

पुणे : “समाजातील व्यवस्थेचा वेध घेण्याची प्रचंड मोठी ताकद लेखणीमध्ये असते. समाजाचे प्रश्न, वास्तव आणि सत्य लेखक व पत्रकार आपल्या लेखणीतून मांडतात. समाजाला नेमके काय द्यायचे हे हेरुन काल्पनिक घटनादेखील लेखक हुबेहुब डोळ्यासमोर उभा करतो. लेखकाची कल्पनाशक्ती प्रचंड असते. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे लेखन आणि विजय नाईक यांची पत्रकारिता समाजाला दिशादर्शक आहे,” असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

लोकशाहीसाठी समंजस संवाद, डेमॉक्रँटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि मित्र परिवाराच्या वतीने दिल्लीस्थित जेष्ठ  पत्रकार विजय नाईक यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि सरस्वती सन्मानप्राप्त लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा सन्मान सुशीलकुमार शिंदे व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  या सोहळ्यावेळी माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ संपादक  विजय कुवळेकर,  दीपा नाईक,  कुसुम लिंबाळे, संयोजक आणि ‘लोकशाही समंजस संवाद’चे संपादक ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, शोभा खोरे आदी उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “डॉ. लिंबाळे यांनी विपुल दलित साहित्य रेखाटले आहे. सद्यस्थितीत समीक्षकांनी त्यांची फारशी दखल घेतली नसली, तरी पुढील पन्नास वर्षात त्यांच्या साहित्याची नक्कीच नोंद घ्यावी लागेल असे त्यांचे लेखन आहे. समाजातील वास्तविक घटनांचा योग्य आणि अचूक वेध घेणे हे लेखक आणि पत्रकारांचे कार्य आहे. यातून क्रांतिकारक समाज घडतो. विजय नाईक यांचे लेखन परराष्ट्र सेवेत येऊ इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक आहे.”

डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणाले, “समाजातील अन्याय, अत्याचार दूर करून समता आणि बंधुतेवर आधारित सुंदर राष्ट्राची निर्मिती हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे. हाच विचार घेऊन आम्ही सर्व दलित साहित्यकार देशाच्या प्रतिमेवरील जातिव्यवस्थेचे काळेकुट्ट डाग धुवून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच साहित्य लेखनाचा हा सन्मान म्हणजे सरस्वती पुरस्कार आहे.”

विजय नाईक म्हणाले, “सरकार आणि विरोधकांमध्ये संवादाचा अभाव आहे. त्यामुळे सर्वच घटकांमध्ये सध्या अस्वस्थता असल्याचे दिसते. अहमदनगर ते दिल्ली प्रवास खूप सुखावणारा असून, जीवन समृद्ध करणाराही आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचा वेध घेता आला याचे समाधान आहे.”

अरुण खोरे यांनी प्रास्ताविक केले. जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading