यूपीएससी परीक्षेत सांगवीतल्या माधुरीची ‘गरुड’भरारी
पिंपरी : इयत्ता आठवीतच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगलेल्या माधुरी भानुदास गरुड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत 561 वी रँक प्राप्त केली. यंदा यूपीएससी उत्तीर्ण होणारी पिंपरी-चिंचवडमधली ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या किंवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिने एक आदर्श निर्माण केला आहे.
दहावीमध्ये तब्बल ९४ टक्के गुण मिळविल्यानंतरही तिने अकरावीला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. शालेय जीवनापासून अधिकारी होण्याचे स्वप्न बघण्यास सुरवात केली व स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवला. यूपीएससी परीक्षेत यश मिळविताना अखेर हिने स्वप्नपूर्ती केली. आई गृहिणी आणि वडील सेल्स टॅक्स विभागात नोकरीला असलेल्या घरात माधुरीने केवळ कठोर परिश्रम व इच्छाशक्तीच्या जोरावर लाल दिव्याची गाडी मिळवून दाखवली आहे.
दहावीमध्ये 94 टक्के गुण मिळविल्यानंतर विज्ञान किंवा वाणिज्य शाखा न निवडता माधुरीने कला शाखा निवडली. कला शाखेतूनच पदवी संपादन केली. पदवीनंतर मानव्यशास्त्र, राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातूनच कायद्याचे शिक्षण (लॉ) घेतले. पदवीनंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला कठीण वाटणारा अभ्यास अल्पावधीतच सुकर होत गेला. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात जाऊन यूपीएससीचा अभ्यास करावा, असे मनोमन वाटले. इच्छाशक्तीच्या जोरावर सारथी संस्थेची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि सारथीची शिष्यवृत्ती मिळालीही. सारथीची शिष्यवृत्ती मिळाल्याने दिल्लीत जाऊन अभ्यास आणि क्लासेस जॉईन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. दिल्लीत खासगी क्लास व सलग 10 ते 15 तास अभ्यास केला.
विशेष म्हणजे मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी कशा प्रकारे करावी, कोणती पुस्तके अभ्यासावीत, याबाबत पुण्यातील जवाद काझी यांची खूप मोठी मदत झाली. नेमका अभ्यास कसा करायचा याबाबत जवाद काझी सरांकडून मार्गदर्शन मिळाले. आपल्या यशात आई, वडील, भाऊ आणि जवाद काझी यांचा मोठा वाटा असल्याचे माधुरी अभिमानाने सांगते.
अभ्यासात सातत्य ठेवून, नियोजन केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवता येईल. त्यासाठी आपले छंद सोडण्याची आवश्यकता नाही. आपला भरतनाट्यम आणि झुंबा डान्स, वाचनाचा छंद जोपासत अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान आत्मचरित्रे खूप वाचली. सचिन तेंडुलकर, मिशेल ओबामा, इंद्रा नुयी, बेंजामिन फ्रॅंकलिन, हिटलर, महात्मा गांधी अशा थोरा मोठ्यांची आत्मचरित्रे वाचली. मोठ्यांकडून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो. त्यांचं ऐकलं तर आयुष्यात खूप पुढे जाता येते, असे माधुरी सांगते.
सोशल मीडियाचा अगदी कामापूरता वापर केला. एकटीच दिल्लीत असल्याने आई वडिलांशी बोलण्यासाठी व्हाट्सएप सुरू ठेवले होते. फेसबुक मात्र तीन वर्षे बंद ठेवले. कारण फेसबुकवरील काही गोष्टींचा मनावर विपरीत परिणाम होऊन अभ्यासपासून लक्ष विचलित होऊ शकते. बाकी सोशल मीडियापासून दूर राहणेच पसंद करते. तरूणाईने गरजेपुरता सोशल मीडियाचा वापर केल्यास उर्वरित वेळ सत्कारणी लागेल, असेही माधुरीने सांगितले.
माधुरीने मिळविलेल्या यशाचे मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, अखिल वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजयआण्णा जगताप यांनी कौतुक करीत अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
