जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा – विजय वडेट्टीवार
बीड:जे वंचित आहेत त्यांनाच वंचितांच्या वेदना माहीत आहेत. सध्या गृहीत धरले जात असल्याने ओबीसींनी ताकद दाखवावी लागेल. दिल्लीत महिनाभर तळ ठोकून बसण्याची तयारी ठेवावी लागेल. ओबीसी समाज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे. आता जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा! असे राज्याचे बहुजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले. वंचित समाजातील लोकांना मुख्यमंत्री पदाची संधी का मिळत नाही, असा सवाल करत त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
आरक्षण बचाव निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सदरील भव्य मेळावा संपन्न होणार आहे. बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, माजी आ. नारायणराव मुंडे, ओबीसीच्या ज्येष्ठ नेत्या प्रा. सुशीला मोराळे, प्रवीण घुगे, प्रा.पी. टी. चव्हाण, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश भागरथ, राजकुमार घुले, युवा प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, संदीप उपरे, प्रा. लक्ष्मण गुंजाळ, नामदेवराव आयलवार, शशिकांत आमने, अंकुशराव निर्मळ, माधवराव निर्मळ, गणेश जगताप, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष जे. डी. शाह, इंजि. विष्णू दादा देवकते, संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. संदीप बेदरे, सोनार समाज युवा प्रदेशाध्यक्ष मंगेशराव लोळगे, दादासाहेब मुंडे, युवराज शिंदे, दलित पॅंथरचे माणिकराव वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विजय वडेट्टीवार म्हणाले, अनेकजण सत्तेत येण्यासाठी ओबीसींचा आधार घेतात; पण मला आयुष्यात काही
स्वत:साठी मिळवायचं नाही. मी आधी सत्तेत आहे आणि या सत्तेचा वापर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी करीत आहे. ते म्हणाले, १२७ वी घटनादुरुस्ती केली, पण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच ठेवली. त्यामुळे ओबीसींमध्ये इतरांना सामावून घेऊन आरक्षण देता येणार नाही.
केंद्रात ओबीसीचे जे खासदार आहेत, त्यांनी ओबीसीचा एम्पिरिकल डाटा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही जर १२७ वी घटना दुरुस्तीत सुधारणा केली तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळू शकते, त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील सुटू शकतो. असेही यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले.
