श्रीधर फडके यांना गदिमा जीवनगौरव सन्मान
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, गदिमा कुटुंबीय आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आयोजित २९ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवात देण्यात येणारा ‘गदिमा जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गदिमांच्या जयंतीदिनी १ ऑक्टोबर रोजी हा सन्मान माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते श्रीधर फडके यांना परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, गदिमांच्या स्नुषा शीतल माडगूळकर, पणतू सुमित्र माडगूळकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कविता महोत्सवात नंदकुमार मुरडे, संगीता झिंजुरके यांना तसेच नितीन देशमुख (अमरावती), प्रशांत केंदळे (नाशिक), शिवाजी चाळक (पिपळवंडी), राजेंद्र उगले (कोपरगाव) या कवींना त्यांच्या कविता संग्रहासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच डॉ. नीलम गायकवाड, अनंत राऊत, सरला पाटील आणि लीनता माडगूळकर-आंबेकर या कविंचाही सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे आयोजित गदिमा काव्यस्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
