सुनिल कांबळेंनी संबंधित महिला कर्मचाऱ्याची जाहीरपणे माफी मागावी -रुपाली चाकणकर
पुणे:पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपा आणि आमदार सुनिल कांबळेवर निशाणा साधला आहे. तसेच, सुनिल कांबळेंनी संबंधित महिला कर्मचाऱ्याची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरुन सुनिल कांबळे यांचा निषेध नोंदवला आहे.
राज्यातील महिला अत्याचारांवरील घटनामुळे काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजप आमदार सुनील कांबळेंवरही चाकणकर यांनी सडकून टीका केली आहे. आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे. ‘भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार’, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केले आहे. दरम्यान, आमदार सुनिल कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिकाऱ्यासोबत संभाषणची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी ती जुनी असल्याची कबुली दिली.
