Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

निस्वार्थी कार्यातून समाजाला सशक्त व समृद्ध करु – शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी

पुणे : मागील दोन वर्षात प्रत्येकालाच अनेक विवंचना, अडचणी आहेत. त्यामुळे आपण समाजातील सर्व घटकांसाठी कसे काम करता येईल, याचा विचार करायला हवा. आपला वेळ, पैसा, श्रम दिले, तरीही त्यातून निस्वार्थीपणे कसे काम करतो, हे महत्वाचे आहे. तरच समाजाला सशक्त व समृद्ध करु शकू, असे मत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी व्यक्त केले.

 माणुसकीचे दूत व्यासपीठातर्फे विश्रामबाग वाडयासमोरील झांजले विठ्ठल मंदिरात धान्य किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसे सरचिटणीस अ‍ॅड.किशोर शिंदे, शिक्षण प्रसारक मंडळाचे पराग ठाकूर, माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, मनसे कामगार सेना उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, मनसे पुणे उपाध्यक्ष प्रशांत कनोजीया, राजेंद्र काकडे, श्रेयस देशमुख, संयोजक सारंग सराफ, करण सुरवसे, अभिजित जागडे, आदित्य राऊत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक सुनील शिवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. घरगुती कामगार, छायाचित्रकार, कलाकार यांना धान्यरुपी मदत देण्यात आली. व्यासपीठातर्फे एकूण ११०० कुटुंबांना धान्याच्या किटची मदत आजपर्यंत देण्यात आली आहे.

विशाल सोलंकी म्हणाले, शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करीत आहोत. आजमितीस राज्यामध्ये ५ ते १० लाख मुले शालाबाह्य होण्याची अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.  प्रत्येकजण मर्यादेत स्वरुपात छोटे काम करीत आहे. पण ते काम आपण किती आत्मियतेने, प्रेमाने करतो हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सारंग सराफ म्हणाले, समाजाच्या विविध क्षेत्रातील गरजूंना धान्यरुपी मदत देण्याकरीता व्यासपीठातर्फे प्रयत्न केला जात आहे. कोविड काळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यांना धान्यरुपी मदत करुन संसार सुरळीत व्हावे, याकरीता आम्ही तरुणांनी एकत्र येऊन हे कार्य हाती घेतले असून सर्वांनी सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. चेतन धोत्रे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading