लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातर्फे २७९ जणांचे लसीकरण
पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे अल्पउत्पन्न धारकांसाठी मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन दत्तभवन येथे करण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या लसीकरण मोहिमेत दिवसभरात २७९ जणांना कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, यांसह विविध संस्थांचे बाळासाहेब पाटोळे, विश्वास कुलकर्णी, योगेश तांबट, लता सत्तुर आदी उपस्थित होते. आनंद सागरे व मित्र परिवार यांचे बुधवार पेठ वस्तीतील महिलांना एकत्र करण्याकरीता विशेष सहकार्य लाभले.
बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक, सिरम इन्स्टिटयूट आॅफ इंडिया, निरामय, सह्याद्री हॉस्पिटल्स आणि स्व-रुपवर्धिनी संस्थेच्या सहकार्याने ही लसीकरण मोहिम घेण्यात आली. मध्यवस्तीतील नागरिकांसह विशेषत: बुधवार पेठेतील देहविक्री करणा-या महिला, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, परिसरात काम करणारे स्वयंसेवक आदींचे लसीकरण करण्यात आले. विशेषत: कोणतेही ओळखपत्र नसलेल्यांचेही लसीकरण करण्यात आले.
