आरोग्य विभागाच्या परीक्षा नियोजना नुसारच होणार; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
– सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. उमेदवारांना परीक्षेबाबत काही शंका असल्यास त्यांनी कॉल सेंटरच्या हेल्पलाईन अथवा जिल्ह्यातील संबंधित कार्यालयात संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले आहे.
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबर २०२१ रोजी आणि गट ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना हॉल तिकीट वेळेत न मिळणे, सर्व्हर डाऊन असणे अशा तक्रारी परीक्षार्थीं कडून केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर टोपे यांनी या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ. साधना तायडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.
उमेदवारांनी प्रलोभनास बळी पडू नये
उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. परीक्षेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभागामार्फत संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.
सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे, असेही टोपे स्पष्ट केले.
