पुणे : दोहा, कतार येथे पार पडलेल्या जागतिक आणि आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सर्वोत्तम स्नूकर खेळाडू पंकज अडवानीने विजतेपद पटकावत आपल्या खात्यात 24 वे जागतिक सुवर्णपदक आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धा असे दोन बहुमान पटकावले. हौशी स्नूकर गटात त्याने ही लक्षवेधी कामगिरी केली.
जागतिक स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत पाकिस्तानचा बाबर मसिह याच्या विरुद्ध पंकज अडवानीने 7-5 असा विजय मिळवला. सामन्यात 2-6 अश्या फरकाने पिछाडीवर असलेल्या बाबरने 5-6 असे पुनरागमन केले होते. परंतु पंकजने आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद पटकावले. तसेच, आशियाई सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत पंकजने इराणच्या आमिर सरखोशचा 6-3 असा पराभव करून विजतेपदाला गवसणी घातली. त्याचे आशियाई स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक असून याआधी 2019 मध्ये त्याने हि कामगिरी केली होती.
बिलियर्ड्स(वेळ व गुण फॉरमॅट)च्या सर्व प्रकारात विजेतेपद पटकवणारा पंकज अडवानी हा जगातील एकमेव खेळाडू असून स्नूकर(१५रेड, १०रेड , सिक्स रेड आणि सांघिक स्नूकर) प्रकारात देखील त्याने विजेतेपद पटकावले आहे. बिलियर्ड्स व स्नूकर प्रकारात आतापर्यन्त 56 जागतिक विजेतेपद पटकावले असून हि आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे.
बिलियर्ड्स अँड स्नूकर संघटनेचे अध्यक्ष राजन खिंवसरा म्हणाले की, पंकज अडवानीला त्याच्या अभूतपूर्व यशाबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. क्यू क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि आणखी प्रोत्साहन वाढविण्यासाठी पंकजकडे अनेक योजना आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्नूकरपटूंना त्यांची कामगिरी आणखी सुधारू शकण्यास मदत होणार आहे. प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सर्व राज्यांतुन 500 अधिक खेळाडू सहभागी होत असून वर्षाच्या अखेरीस याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, बिलियर्ड्स आणि स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे राजन खिंवसरा अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशनचे सदस्यदेखील आहेत.
ते म्हणाले की, नजीकच्या भविष्यात स्नूकरचा समावेश ऑलिम्पिकमध्ये केला जाईल, अशी मला आशा आहे आणि तसे झाल्यास आमचे स्नूकरपटू नक्कीच ऑलिंपिक पदक पटकावून पदकांच्या संख्येत वाढ करतील.
Related