Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला विश्वात मान्यता – प्रमोद रैना

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेल केवळ आपल्या देशात नव्हे संपूर्ण विश्वात मान्यता मिळाली आहे. बहुजन समाजाने वेगवेगळे खड्डे खोदून सत्तेची तहान भागणार नाही. यासाठी बहुजन समाजासह सर्व धर्मीयांना एकत्रित करून संघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. केवळ नेत्यांच्या हो ला हो करून चालणार नाही, तर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. तरच बाबासाहेबांना अपेक्षित बहुजन समाजाला सत्ता मिळेल, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्रमोद रैना यांनी केले. 

बहुजन समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ता संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील ७ ऑगस्टला विदर्भात सुरुवात झालेली ही संवाद यात्रा १८ सप्टेंबरला पुण्यात पोहचली. यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी या यात्रेचे स्वागत व संयोजन केले. 

याप्रसंगी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड.संदीप ताजने, राहुल ओव्हाळ, विद्या जाधव, सुरज गायकवाड, सुदीप गायकवाड, सुरेश गायकवाड,  बापूसाहेब कुदळे, भाऊसाहेब शिंदे, सोनभाऊ निकाळजे, काळूराम चौधरी, रमेश गायकवाड व  कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

 संदीप ताजने म्हणाले, की ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले अन स्वतःच्या जातीचा ‘ओबोसी’मध्ये समावेश केला. प्रत्यक्षात मात्र त्यांनी ओबीसींना धडा शिकवला. भारतीय जनता पक्षाचा जन्मच मुळात आरक्षणाला विरोध करण्यासाठी झाला आहे. हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले जाणतात, मात्र ओबीसी आरक्षणासाठी ते करत असलेले आंदोलन हे केवळ देखावा आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी मंडल आयोगाला विरोध म्हणून रथयात्रा काढली होती. आरक्षण लागू होऊ नये हीच काँग्रेस व भाजपची विचारधारा आहे. 

हुलगेश चलवादी म्हणाले, बसपाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात पुण्यातून झाली. विद्येचे माहेरघर असूनही पुण्यामध्ये बसपाला यश मिळाले नाही. मात्र कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात क्रांती घडवली अन या पक्षाकडे अनेकवेळा मुख्यमंत्री पद आले. उत्तर परदेशातून अनेक खासदार निवडल्याने बसपाने केंद्रातही मोठी ताकद निर्माण केली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातून जन्माला आलेल्या बसपाला उत्तर प्रदेशात खरी ओळख मिळाली. आता जर आपण एकवटलो तरच सत्ता आपल्या हाती मिळेल. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचा अहंमभाव बाजूला सारून संघटना मजबूत केली पाहिजे. बसपाचे पुणे जिल्हा प्रभारी गणेश खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. 

Leave a Reply