घोराडेश्वर आणि निगडीत मध्यरात्री खूनाच्या दोन घटना, आरोपींना अटक
पिंपरी : पूर्ववैमन्यासातून निगडीमध्ये एकाचा खून केल्याची घटना घडली. तर शरीर संबंधास नकार दिल्याने घोराडेश्वर येथे चुलत दीरानेच महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री उघडकीस आल्या असून पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत संपत गायकवाड (वय 45, रा. अण्णाभाऊ साठे नगर, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत संपत गायकवाड आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. रविवारी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. त्यात संपत यांनी भांडण सोडविण्याची भूमिका घेतली. या कारणावरून आरोपींनी संपत यांच्यावर शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घाटनास्थळी दाखल झाले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिताली सोमनाथ धडस (वय २५, सध्या रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा चुलत दीर तुकाराम कोंडीबा धडस (वय २४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिताली आणि आरोपी तुकाराम हे रविवारी (दि. १९) घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपीने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. महिलेने त्यास विरोध केल्याने चिडलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. तसेच, ओळख पटू नये यासाठी महिलेच्या डोक्यात दगड घालून मृतदेह झुडपात फेकून दिला. दरम्यान, सोमवारी पहाटे पोलिसांना घटनेची माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेची ओळख पटवून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.
