राज्यपाल महोदय महिलेच्या तोंडांवरचा मास्क स्वतःच काढतात तेव्हा …

पुणे : एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत असतानाच दुसरीकडे आज खुद्द राज्यपालांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आहे. पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते एका महिला सायकलपटूचा सत्कार करण्यात आला. यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी चक्क त्या महिलेच्या तोंडावरचा मास्क स्वतःच्या हाताने खाली खेचला. या प्रकाराने उपस्थितांमध्ये हशा तर पिकलाच. शिवाय वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, यापूर्वी एका कार्यक्रमा दरम्यान, अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला स्वतःच्या हाताने केक भरवल्याने कोश्यारी चर्चेत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर दरम्यान ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या  कार्यक्रमा प्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना हा प्रकार घडला.

“त्यांनी काही केलं तरी त्यावर मी बोलू शकत नाही…”

आज पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीवरील आढाव बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या  नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सदर प्रकारावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम आहेत. त्यांनी काही केलं तरी त्यावर मी बोलू शकत नाही. त्यांनी शपथ देताना आम्हाला मास्क काढायला सांगितला तर काढावाच लागेल.’

 

Leave a Reply

%d bloggers like this: