डॉ.गेलं यांचे सत्यशोधक चळवळीत योगदान विसरता येणार नाही – डॉ.सदानंद मोरे
पुणे : डॉ.गेल यांनी सत्यशोधक आणि ब्राम्हणेतर चळवळीचे विश्लेषण करून येथील समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकून अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. ते विसरता येणार नाही, असे मत डॉ .सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
मूळ अमेरिकन असलेल्या आणि १९८२ पासून भारतीय नागरिक झालेल्या विदुषी आणि डॉ.भारत पाटणकर यांच्या जीवनसाथी डॉ.गेल यांचे २५ ऑगस्ट २०२१ रोजी सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे निधन झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे त्यांच्या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर , डॉ.मनोहर जाधव, डॉ सुरेंद्र जोंधळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ‘प्रा.डॉ. गेल ऑम्वेट : सैद्धांतिक आकलन ‘, या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली. विद्यापीठाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभाग, इतिहास विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांनी या अभिवादन सभेचे आयोजन केले होते.
डॉ. गेल यांनी सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचे जे विश्लेषण केले, ते फार मोलाचे होते त्यामुळे त्यांचे योगदान विसरता येणार नाही, असे मत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे योगदान डॉ.गेल,डॉ.य. दि. फडके आणि डॉ. बाबा आढाव यांनी सखोल प्रमाणात मांडणी करण्याचे मोठे काम केले आहे. फुले-आंबेडकरांचा शोध घेताना गेल या तुकोबांकडे येणार होत्याच. मी नसताना त्या आमच्या देहूच्या घरी असल्याची आठवण त्यांनी सांगितली.
प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी गेल यांचे फुले-आंबेडकरी चळवळीचे विश्लेषण आणि विचार मंथन हे जागतिक विद्यापीठांच्या स्तरावर नोंदले गेले असल्याचा मुद्दा मांडला. गेल यांच्या निधनानंतर भारतातील विविध विद्यापीठांमधून त्यांना अभिवादन करताना त्यांच्या वैचारिक विश्लेषणाचे योगदान अधोरेखित केले जात असल्याचे ते म्हणाले.
अरुण खोरे म्हणाले, भारतातील दलित, मागास आणि कृषक वर्गाच्या बळीराजासारख्या प्रतीकांचे महत्त्व डॉ. गेल यांनी नव्याने मांडले. फुले-आंबेडकरी चळवळीला १९७0 नंतर जी गती मिळाली, त्याला वैचारिक दिशा देण्याचे मोठे काम डॉ.गेल आणि डॉ.एलिनोर झेलीयट यांनी केले.
डॉ. आंबेडकर अध्यासनाचे डॉ. मनोहर जाधव, इतिहास विभागाच्या डॉ.श्रद्धा कुंभोजकर, स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभागाचे प्रा.संजयकुमार कांबळे आणि आजीवन अध्ययन विभागाचे डॉ. धनंजय लोखंडे यांच्या पुढाकाराने ही अभिवादन सभा घेण्यात आली.
