स्पर्धा परीक्षा देताना मिळालेला अनुभव ही आयुष्याची पुंजी – निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी
पुणे : स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही, म्हणजे संपूर्ण जीवनात अयशस्वी झालो असे नाही तर समाजामध्ये उभे राहण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने ग्रॅज्युएट झालात. स्पर्धा परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि सामान्य माणूस यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. अपयशाकडे अपयश म्हणून बघू नये. स्पर्धा परीक्षा देताना यश मिळाले नाही, तरी तुमच्या व्यक्तिमत्वात जो बदल होतो, ती तुमच्याकडे जमा झालेली पुंजी आहे. असे मत निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने सेवा ग्लोबल आॅनलाईन गणेशोत्सव साजरा होत आहे. या अंतर्गत स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी चंद्रकांत दळवी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे ,शिरीष मोहिते, वैभव वाघ, विक्रांत मोहिते, अमेय थोपटे, उमेश कांबळे यावेळी उपस्थित होते. सेवा मित्र मंडळाचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे.
चंद्रकांत दळवी म्हणाले, स्पर्धा परीक्षा देताना, सकारात्मक भावना, संयम, आत्मविश्वास, स्वअभ्यास करण्याची सवय असायला हवी. विद्यार्थ्यांना वेळेबरोबर स्पर्धा करण्याच्या दृष्टीने सराव करावा लागेल. ३ वर्षे परीक्षा देऊन मग ठरवायला हवे की थांबायचं आहे की पुढे जायचे आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर रहायला हवे.संवाद कौशल्य आणि नेतृत्वगुणाचा विकास करायला हवा असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शूरा मी वंदिले, घेऊ भरारी या कार्यक्रमांसह सुखकर्ता दु:खहर्ता आरती, गणेशगीत नृत्य, गणेश भक्तीगीत गायन, गोष्टी सांगा, सामाजिक संदेश फोटोग्राफी अशा विविध स्पर्धांनी सेवा ग्लोबल आॅनलाईन गणेशोत्सव साजरा होत आहे. आॅनलाईन स्वरुपात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांकरीता अनुभविता येतील असे कार्यक्रम करण्यात आले आहेत.
