Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस विचारांवर हैद्राबाद स्टेट काँग्रेसचा लढा यशस्वी झाला – श्रीपाल सबनीस

पुणे : जुलमी निजाम राजवटीला हैद्राबाद संस्थानातील सामान्य नागरिकांनी काँग्रेस विचारांवर निकराचा लढा दिला. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, उध्दवराव पाटील, गंगाप्रसाद अग्रवाल, गोविंदभाई श्रॉफ अशा गांधी विचारांवर निष्ठा असलेल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली निजाम राजवटीला मुठ माती दिली गेली. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची दूरदृष्टी व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या धडाडीच्या नेतृत्वाने हैद्राबाद संस्थानातील जनता १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाली. असे प्रतिपादन पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित हैद्राबाद संस्थान स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना श्रीपाल सबनीस यांनी केले.

यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता संजीव शुक्ला, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके, प्रदेश प्रतिनिधी नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट,  शिलार रतनगिरी, डॉ. अभिजीत बाबर, सुनिल पंडित, अविनाश सोळंकी, परमेश्वर अंडिल, भरत सुराणा, मुन्नाभाई शेख, विल्सन चंदेलवाल, स्वप्निल शेंडगे, अभिषेक शेळके, धनंजय अंडिल, अजय शेंडगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सबनीस म्हणाले की, ‘‘हैद्राबाद मुक्ती संग्रामाची लढाई धर्माच्या आधारावर घेवून जाऊन संस्थानात द्वेष पेरण्याचे काम क्रुर आणि हिंसक कासिम रिझवीच्या रजाकार संघटनेने केले. मात्र हैद्राबाद संस्थानातील सुज्ञ जनतेने काही अपवाद वगळता ही लढाई हिंदू मुस्लिम संघर्षात परावर्तित होऊ दिली नाही. हे यश गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली लढलेल्या हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे आहे. मराठवाड्यातील जनतेला उर्वरीत महाराष्ट्राने विकासाच्या बाबतीत सोबत घ्यावे. विनाअट महाराष्ट्रात सहभागी होणारा मराठवाडा आज विविध समस्यांनी ग्रस्त आहे. काँग्रेसला मराठवाड्याच्या जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. आता काँग्रेसने मराठवाड्याचा विकासाचा असमतोल दूर करण्याची लढाई उभी करावी.’’

यावेळी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र करण्यात महत्वाची भूमिका निभविणारे काँग्रेस नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व या लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  ॲड. अभय छाजेड यांनी केले तर आभार किसान काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading