कोविड काळात गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अभूतपूर्व- पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांचे गौरवोद्गार
पुणे : कोविड काळात सर्व मंदिरे बंद होती, परंतु गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी मानवसेवेची महामंदिरे उघडून समाजाची सेवा केली आहे. याकाळात शारीरिक अंतर असले तरी मानसिक अंतर या कार्यकर्त्यांनी आपल्या कामातून कमी केले. कोविड काळात गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आणि अभूतपूर्व आहे. या कठीण काळात सर्वांनी एकत्रित येऊन काम केले, याचा अभिमान वाटतो. ही भावना अमेरिकेसारख्या देशात देखील दिसत नाही. त्यामुळे गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे संकलन असलेले हे पुस्तक पुढची अनेक वर्षे समाजाला संदेश देण्याचे कार्य करेल, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
जय गणेश व्यासपीठ या पुण्यातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या हक्काच्या व्यासपीठातर्फे शहरातील १०० गणेशोत्सव मंडळांनी कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याचे संकलन असलेल्या विघ्नहर्ता कार्यकर्ता या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराशेजारील स्वागत मंडपात झाले. यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, उपअधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व जय गणेश व्यासपीठाचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, पुस्तकाचे संपादक पराग पोतदार, शिरीष मोहिते, पीयुष शाह आदी उपस्थित होते.
डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले, कोविडची तिसरी लाट येणार की नाही, हे आपल्या हातात आहे. कोविडनंतर डेल्टा व्हेरिएंट सारख्या विषाणूंचे रुग्ण सापडत आहेत. मास्क बंदी उठविलेला इस्राईल सारखा देश देखील आज लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे आपले भविष्य आपल्या हातात आहे. प्रत्येकाने लस घेणे,मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर राखणे यामुळे तिसरी लाट येण्यापासून रोखू शकतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशभक्तीच्या पुढे जाऊन अनेक सामाजिक कामे करण्यात येतात. जय गणेश ज्ञानवर्धन योजना, ससूनमधील अन्नछत्र, कुष्ठरोग्यांसाठी काम याशिवाय कोविड काळातील कार्य देखील वाखाणण्याजोगे आहे. गणेशोत्सव मंडळांना समाजातील काही घटक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. अनेकांना गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक कार्याची कल्पना नाही, असेही ते म्हणाले.
डॉ.विनायक काळे म्हणाले, श्रीमंत दगडशेठ गणपती ट्रस्टतर्फे कोविड काळात व त्यापूर्वीही निरंतरपणे रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यामुळे हजारो रुग्णांना सकस आहार व चांगले उपचार आम्ही देऊ शकलो, हे गणेश मंडळाचे मोठे कार्य आहे.
