Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यावर्षी सुरू होणार

पुणे :  पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला  केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनने आज (गुरुवार) मान्यता दिली आहे.  येत्या शैक्षणिक वर्षापासून मंगळवार पेठेतील सणस विद्यालय आणि कमला नेहरू रुग्णालयामध्ये १०० विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षासाठी प्रवेश दिले जाणार आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उपचार सुविधा उपलब्ध होणार असून महापालिकेच्या रुग्णालयांना देखिल अतिरिक्त तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. २०१७ मध्ये स्थायी समिती अध्यक्ष असताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली होती. मागील साडेतीन चार वर्षामध्ये सर्वसाधारण सभेच्या मान्यतेपासून राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांची मंजुरी. वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्याची तांत्रिक प्रक्रिया, तसेच प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू करण्यासाठी भौतिक सुविधा निर्माण करणे व मनुष्यबळ उप्लब्ध करून देण्याची प्रक्रिया करण्यात आली. आज नॅशनल मेडिकल कमिशनने या महाविद्यालयाला परवानगी दिल्याने महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची अंतिम परवानगी अपेक्षित आहे, यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिकेचे हे पहिलेच मेडिकल महाविद्यालय व रुग्णालय आहे. अहमदाबादच्या धर्तीवर ट्रस्टच्या माध्यमातून या महाविद्यालय व रुग्णालयाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या ट्रस्टमध्ये महापौरांसह सर्व पदाधिकारी व गटनेत्यांचा ट्रस्टमध्ये समावेश आहे.  सुरूवातीच्या टप्प्यात सणस विद्यालय व कमला नेहरू रुग्णालयामध्ये हे महाविद्यालय चालविण्यात येईल. दरम्यानच्या काळात डॉ. नायडू सांसर्गिक महाविद्यालयाच्या जागेवर महाविद्यालयाचे वर्ग व ५०० बेड क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात येईल. या संपुर्ण प्रक्रियेसाठी ६५२ कोटी रुपये खर्च महापालिका टप्प्याटप्प्याने करणार आहे. महाविद्यालयाच्या संचलनासाठी दरवर्षी १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. तो खर्च कमी करण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी महापालिका स्तरावर महापौर मुरलीधर मोहोळ व सर्व पदाधिकारी, विरोधी पक्ष, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण, उपायुक्त सुनिल इंदलकर यांच्यासह आरोग्य विभागाच्या सर्वच अधिकार्‍यांनी विशेष मेहनत घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी व केंद्रीय मंत्र्यांनीही गती दिल्याने कोरोना सारख्या महामारीच्या काळातही या महाविद्यालयाची सर्व प्रक्रिया वेगात पार पडली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading