वर्धा नदीत होडी उलटल्याने 11 जण बुडाले, तीन जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता

अमरावती जिल्ह्यातील झुंज येथिल घटना   

अमरावती : वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे दशक्रियाविधीसाठी आलेल्या नातेवाईकांवर काळाने घाला घातला आहे. यावेळी वर्धा नदीतील एकाच होडीत क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती बसल्याने 11 जण बुडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून इतर आठ जणांचा शोध सुरु आहे. या घटनेत तीन कुटूंबातील व्यक्तींचा समावेश आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नारायण मटरे (वय 45, रा. गाडेगाव), वांशिका शिवणकर (वय 2, रा. तिवसाघाट), किरण खंडारे (वय 28, रा. लोणी) ही मृतदेह सापडलेल्या नातेवाईकांची नावे आहेत. तर इतर आठ नातेवाईकांचा शोध सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक जण दर्शनसाठी तसेच दशक्रिया विधी पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी नातेवाईकांचा दशक्रिया विधी पार पाडण्यासाठी तीन कुटुंब येथे आले होते. या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत होडी उलटल्याने बुडाल्याची घटना घडली. यात तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून आठजण बेपत्ता असून त्याचे शोधकार्य सुरू आहे. ग्रामस्थांच्या मदतीने युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. वरुड तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: