प्रभावी होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता – अॅड. उज्ज्वल निकम

पुणे : “ऍलोपॅथी-होमिओपॅथी हा वाद, त्यातील मतमतांतरे जुना विषय आहे. पण होमिओपॅथीने अनेक चमत्कार घडवल्याचे पहिले आहे. ही पॅथी अनेक आजारांवर गुणकारी आहे. ऍलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरीत परिणाम होतात. होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणत्याही ऑपरेशन किंवा इंजेक्शन शिवाय केवळ पांढऱ्या गोळ्या प्रभावी ठरतात. त्यामुळे होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी केले.

मिशन होमिओपॅथी व आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. अमरसिंह निकम लिखित ‘अ होमिओपॅथस् गाईड टू कोविड-१९’ या पुस्तकाचा प्रकाशन व ‘होमिओपॅथीक कोविड हिरो’ सन्मान सोहळ्यात ऍड. निकम बोलत होते. रावेत येथील हॉटेल ब्लू वॉटर येथे झालेल्या सोहळ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रवीण दबडगाव, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम, डॉ. जसवंत पाटील, अजय कौल, ऍड. आसावरी जगदाळे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते.
ऍड. उज्ज्वल निकम म्हणाले, “कोणतेही सेवा देताना नीतिमूल्यांची जाणीव आणि सखोल अभ्यास हवा. डॉ. निकम या दोन्ही गोष्टींचा अवलंब करत होमिओपॅथीला सर्वमान्य होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर आनंदाबरोबच संकटाचाही सामना करण्याची क्षमता आपल्यात असावी. निगर्वी, प्रामाणिक वागण्यातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न हवा.”
डॉ. अमरसिंह निकम म्हणाले, “कोविडसारखे व्हायरस येतील आणि जातीलही; पण होमिओपॅथी आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. हजारो आजारांवर होमिओपॅथी उपचार अत्यंत प्रभावी आहेत. शहरी, ग्रामीण भागात सर्वसामान्यांना परवडेल, अशा स्वरूपाची ही उपचारपद्धती आहे. यामध्ये ऑपरेशन नाही की इंजेक्शन नाही. केवळ गोळ्यांनी आजार बरा करण्याची क्षमता आहे. होमिओपॅथीकडे अनेकजण शेवटचा पर्याय म्हणून पाहतात. पण होमिओपॅथी सर्व आजारांवर उपचार देणारी पद्धती आहे. कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीनीही होमिओपॅथी औषधांबाबत सकारात्मकता दाखवली. त्यामुळे राज्यभरात ही औषधे मोफत देता आली. प्रतिबंधक औषध म्हणून त्याचा चांगला उपयोग झाला.”

Leave a Reply

%d bloggers like this: